
इंग्लंडमध्ये गौतम गंभीरच्या सिचुएशनवर ‘कश्मीर की कली’ चित्रपटातील ‘दीवाना हुआ पागल, सावन की घटा छाई, ये देख के दिल झूमा, ली प्यार ने अंगडाई’ गाण्याची आठवण येते. श्रावण महिन्यात ओव्हलच्या मैदानात टीम इंडियाने जो ऐतिहासिक विजय मिळवला, त्यानंतर गौतम गंभीरने पहिल्यांदाच अशा प्रकारचा सेलिब्रेशन केलं असेल. भारत-इंग्लंडमधील पाच टेस्ट मॅचच्या सीरीजमधील हा शेवटचा कसोटी सामना अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. या रोमांचक टेस्ट सामन्याचा जो शेवट झाला, त्यानंतर टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांनी थेट कडेवरच उडी मारली. नवऱ्याला किती आनंद झालेला, ते पत्नी नताशाने सामन्यानंतर सांगितलं.
टीम इंडियाच्या विजयात गौतम गंभीर इतके बुडून गेलेले की, सेलिब्रेशन करताना ते कडेवर चढले. हेड कोच गौतम गंभीर यांनी हे सेलिब्रेशन ड्रेसिंग रुममध्ये साजरं केलच. सगळ्यांसोबत ते तिथे नाचले, गळाभेट घेतली. पण जसे टीमचे बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल त्यांच्यासमोर आले, त्यावेळी गंभीर थेट उडी मारुन त्यांच्या कडेवरच जाऊन बसले. मैदानात सिराजने शेवटची विकेट घेताच ड्रेसिंग रुममध्ये जोरदार सेलिब्रेशन झालं. तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
गंभीरच्या कोचिंगखाली भारताने किती टेस्ट मॅच गमावल्यात?
गौतम गंभीरसाठी ओव्हलचा विजय, सीरीज ड्रॉ होणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण या सगळ्याशी गंभीरचे चाहते आणि भारतीय क्रिकेट फॅन्सच एक कनेक्शन आहे. ओव्हल टेस्टमधील विजय हा गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये भारताला मिळालेला तिसरा कसोटी विजय आहे. त्याच्या कोचिंगखाली टीम इंडियाने आतापर्यंत 8 कसोटी सामने गमावलेत. म्हणून त्याच्यासाठी ओव्हल टेस्ट विजय महत्त्वाचा होता.
‘हा त्यांच्या विश्वासाचा विजय’
टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्यासाठी ओव्हल टेस्ट विजय किती महत्त्वाचा आहे, ते मॉर्ने मॉर्केलच्या कडेवर ते चढले त्यातून दिसून येतं. गौतम गंभीरची पत्नी नताशाने इन्स्टा स्टोरी शेअर केली. त्यात तिने लिहिलय की, ‘हा त्यांच्या विश्वासाचा विजय आहे. त्यांच्यासाठी मॅच तो पर्यंत संपली नव्हती, जो पर्यंत मॅच पूर्णपणे संपत नाही’