हा काय मुर्खपणा लावला, आकाश सिंहला त्याची जागा दाखवली; त्या सेलिब्रेशनमुळे माजी क्रिकेटर संतापला!
यंदाचा आयपीएल हंगाम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहे. गोलंदाज आकाश सिंह याने केलेल्या सेलिब्रेशनमुळे सध्या अनेक माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Akash Singh Celebration : यंदाचा आयपीएल हंगाम अनेक कारणांमुळे कायम चर्चेत राहतो आहे. या हंगामात खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करत आहेत. आता लखनऊ सुपर जायंट्स या संघाचा वेगवान गोलंदाज आकाश सिंह याने केलेल्या एका आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनची सगळीकडे चर्चा आहे. विशेष म्हणजे त्याच्या या सेलिब्रेशनमुळे अनेकजण त्याच्यावर टीकादेखील करत आहेत. काही माजी क्रिकेटर्सने तर आकाश सिंह याला चांगलंच सुनावलं असून सेलिब्रेशनची ही पद्धत मूर्खपणाची आहे, असं मत व्यक्त केलंय.
आकाश सिंह याच्या सेलिब्रेशनमुळे वाद का होतोय?
आकाश सिंह हा लखनऊ सुपर जायंट्स या संघाकडून खेळतोय. तो वेगवान गोलंदाज आहे. चेन्नई सुपरकिंग्जविरोधात झालेल्या सामन्यात त्यांनी 26 धावा देऊन तीन गडी बाद केले. यावेळी त्याने चेन्नईचा गडी बाद करताच खिशातून एक चिठ्ठी काढत ती प्रेक्षकांना दाखवली. विशेष म्हणजे त्याने प्रत्येक विकेटनंतर ही चिठ्ठी बाहेर काढून सेलिब्रेशन केले. अगोदर त्याच्या चिठ्ठीवर नेमके काय आहे? असे विचारले जात होते. परंतु आता प्रेरणा मिळावी म्हणून तो अशा प्रकारे चिठ्ठी बाहेर काढत होता, असे सांगितले जात आहे. त्याच्या चिठ्ठीवर #Akkionfire असे लिहिलेले होते.
हा तर निव्वळ मुर्खपणा
दरम्यान, माजी क्रिकेटर अंबाती रायडू यांना मात्र आकाश सिंहचे हे सेलिब्रेशन अजिबात आवडलेले नाही. अशा प्रकारच्या सेलिब्रेशनवर बंदी घालायला हवी, असे मत अंबाती रायडू यांनी व्यक्त केले. तसेच अशा प्रकारचे सेलिब्रेशन करणे हे निव्वळ मुर्खपणाचे आहे, असेही मत रायडू यांनी व्यक्त केले. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेननेही यावर नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारचे सेलिब्रेशन आता थांबवले पाहिजे. आता हा ट्रेंड संपला आहे, असे मत त्याने एक्स या समाजमाध्यमावर व्यक्त केले.
तरी मी सेलिब्रेशन करतच राहणार
दरम्यान, चिठ्ठी काढून सेलिब्रेशन काढण्यावर आक्षेप घेतला जात असला तरीही आकाश सिंह याने मात्र स्वत:च्या कृत्याचे समर्थन केले आहे. अशा प्रकासे सेलिब्रेशन केल्यास माझा आत्मविश्वास वाढतो. आगामी सामन्यांतही मी अशाच पद्धतीने सेलिब्रेशन करत राहील, असे आकाश सिंह म्हणाला आहे.