
बहुचर्चित आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणते दोन संघ आमनेसामने येतील हे आता स्पष्ट झाले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या रविवारी, म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल. आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. आशिया कपची सुरुवात 1984 साली झाली. सध्याचा आशिया कप हा स्पर्धेचा 17 वा हंगाम आहे. पहिला हंगाम 2016 मध्ये टी-20 स्वरूपात आणि दुसरा 2022 मध्ये खेळवण्यात आला होता. सध्याचा हंगाम हा तिसरा हंगाम आहे ज्यामध्ये टी-20 स्वरूप खेळवण्यात आले आहे.
आत्तापर्यंत कोणी कोणी जिंकला आशिया कप ?
पहिल्या आशिया कपचा अंतिम सामना 1984 साली युएईमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला होता. त्यात भारताने विजय मिळवला होता. दुसरा आशिया कप 1986 मध्ये श्रीलंकेत खेळला गेला होता. श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले. 1988 मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या तिसऱ्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला हरवले. 1990 मध्ये भारतात झालेल्या चौथ्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला हरवले. तर 1995 मध्ये भारताने श्रीलंकेला हरवून युएईमध्ये पाचवा आशिया कप जिंकला. 1997 मध्ये श्रीलंकेत झालेल्या सहाव्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताला हरवले.
2000 साली बांगलादेशमध्ये आशिया कपची सातवी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानने श्रीलंकेला हरवून ही स्पर्धा जिंकली होती. 2004 मध्ये श्रीलंकेत झालेल्या आठव्या आशिया कपमध्ये श्रीलंकेने भारताला हरवून विजेता बनला होता. 2008 साली आशिया कपची नववी आवृत्ती पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली होती. तेव्हा भारताला हरवून श्रीलंकेने विजय मिळवला. तर 2010 साली आशिया कपची दहावी आवृत्ती श्रीलंकेत खेळवण्यात आली. भारताने श्रीलंकेला हरवून विजेतेपद पटकावले. 2012 मध्ये आशिया कपची अकरावी आवृत्ती बांगलादेशात झाली. बांगलादेशला हरवून पाकिस्तान विजेता ठरला.
त्यानंतर 2014 साली बांगलादेशमध्ये आशिया कपची बारावी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानला हरवून श्रीलंकेने विजेतपद पटकावले. 2016मध्ये मध्ये आशिया कप (13 वी आवृत्ती) पहिल्यांदाच टी-20 स्वरूपात खेळवण्यात आला. बांगलादेशमध्ये झालेल्या स्पर्धेत भारत विजेता ठरला होता.पराभूत संघ बांगलादेश होता. आशिया कपचा 14 वा हंगाम 2018 मध्ये युएईमध्ये एकदिवसीय स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. भारताने बांगलादेशला हरवून विजय मिळवला होता. 2022 मध्ये, आशिया कपचा दुसरा हंगाम (15 वा हंगाम) युएईमध्ये टी-20 स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. श्रीलंका गतविजेता होता, त्याने अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवले. 2023 चा आशिया कप (16 वी आवृत्ती) पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला.
आठवेळा जिंकलाय भारत
आशिया कपमध्ये भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे, त्याने आठ वेळा विजेतेपद जिंकले आहे. सहा विजेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी संघ आहे. पाकिस्तानने दोनदा आशिया कप जिंकला आहे.