
आरसीबीने पंजाबचा पराभव करुन आयपीएलची ट्रॉफी जिंकली. आज बंगळुरूत आरसीबीच्या विजयाचा जल्लोषादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत जवळपास १० जणांचा मृत्यू झाला आहे.यात अनेक लहान मुलांसह महिलांचाही समावेश आहे. त्यामुळे आरसीबीच्या विजयी मिरवणूकीला गालबोट लागले आहे. या दुर्दैवी घटनेत नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीचाही मृत्यू झाला आहे.
१४ वर्षीय दिव्यांशीचा मृत्यू
आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबी संघाच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी मैदानाच्या गेटवर हजारो चाहत्यांची गर्दी जमली होती. यात १४ वर्षीय दिव्यांशी आणि तिच्या पालकांचाही समावेश होता.दिव्यांशी आरसीबीच्या संघातील खेळाडूंना पहायला आली होती. मात्र चेंगराचेंगरीत ती गायब झाली. त्यानंतर तिच्या पालकांनी तिचा फोटा दाखवत, “माझ्या मुलीला पाहिलं का?” असा सवाल पोलिस आणि प्रशासनाला विचारला. मात्र गर्दीत दिव्यांशीचा श्वास गुदमरला आणि तिला आपला जीव गमवावा लागला.
दिव्यांशीच्या मृत्यूला जबाबदार कोण?
बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेत दिव्यांशीसह १० जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेवेळी स्टेडियमच्या गेटवर पुरेशा सुरक्षेचा अभाव होता, त्यामुळे या घटनेला आयोजकांना जबाबदार धरले जात आहे. तसेच या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
डी के शिवकुमार यांनी मागितली माफी
कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. शिवकुमार म्हणाले की, ‘आरसीबीच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. मी पोलिसांना दोष देणार नाही. 5 हजार पोलीस तैनात होते. या दुर्घटनेत पोलिसांचा दोष नाही. घडलेल्या दुर्घटनेबद्दल आम्ही माफी मागतो”