
टीम इंडियाने ICC ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध विजयाचा सिलसिला कायम ठेवला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. दुबईत रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर 6 विकेटने विजय मिळवला. विराट कोहली टीम इंडियाच्या या विजयाचा नायक ठरला. त्याने शानदार शतक झळकवून टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सलग 2 सामने जिंकून टीम इंडियाचे 4 पॉइंट्स झाले आहेत. भारतीय संघ सेमीफायनलच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. पाकिस्तानच आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटले की, टीम इंडिया अजूनही सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकते.
8 टीमच्या या टुर्नामेंटचा फॉर्मेटचा असा आहे की, सलग दोन दमदार विजय मिळवल्यानंतरही टीम इंडिया टुर्नामेंटमधून बाहेर होऊ शकते. तर्काच्या आधारावर पहायला गेल्यास असं होण्याची शक्यता फार कमी आहे. पण क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यात कधीही काहीही होऊ शकतं. पॉइंट्स टेबलची गणितं आणि समीकरणं अशी आहेत की, असं होऊ शकतं. म्हणून हे पूर्ण समीकरण समजून घ्या.
पॉइंट्स टेबलच गणित कसं आहे?
आधी पॉइंट्स टेबलची गोष्ट समजून घ्या. सलग 2 विजयासह टीम इंडिया 4 पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर आहे. 2 पॉइंट्ससह न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. बांग्लादेश तिसऱ्या आणि पाकिस्तान चौथ्या. दोन्ही टीम्सनी अजून एकही विजय मिळवलेला नाही.
उरलेल्या 3 सामन्यात असं झालं तर….
आता सेमीफायनलच गणित समजून घेऊया. सलग 2 विजयासह टीम इंडियाचे नॉकआउट राउंडमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित आहे. पण अजूनही या ग्रुपमधल्या 3 मॅच बाकी आहेत. पुढचा सामना आज सोमवारी 24 फेब्रुवारीला न्यूझीलंड आणि बांग्लादेशमध्ये खेळला जाणार आहे. अशा स्थितीत आजचा सामना बांग्लादेशने जिंकला, तर त्यांचे 2 पॉइंट होतील. बांग्लादेशचा शेवटचा सामना पाकिस्तान विरुद्ध आहे. हा सामना सुद्धा जिंकल्यास त्यांचे 4 पॉइंट्स होतील. या स्थितीत न्यूझीलंडचे फक्त दोनच पॉइंट्स असतील. न्यूझीलंडचा शेवटचा सामना भारताविरुद्ध आहे. हा सामना न्यूझीलंडने जिंकल्यास त्यांचे 4 पॉइंट्स होतील.
…तर टीम इंडिया होईल बाहेर
ग्रुप ए मध्ये तीन टीम्सचे 4-4 पॉइंट्स झाले, तर अशा स्थितीत निर्णय रनरेटच्या आधारावर होईल. बांग्लादेशने आपले दोन्ही सामने मोठ्या अंतराने जिंकले, तर त्यांचा जो सध्याचा रनरेट आहे -0.408. तो अजून सुधारेल. सध्या टीम इंडियाचा रनरेट 0.647 आहे. न्यूझीलंडचा रनरेट 1.200 आहे. टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध शेवटचा सामना मोठ्या फरकाने गमावल्यास टीम इंडियाचा रनरेट कमी होईल. न्यूझीलंडचा आणखी सुधारणार हे सहाजिक आहे. अशावेळी नेट रनरेटच्या बाबतीत टीम इंडिया मागे पडली, तर सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होईल. आजच्या सामन्यात न्यूझीलंडने बांग्लादेशला हरवलं, तर भारत, न्यूझीलंड दोन्ही टीम्स सेमीफायनलमध्ये दाखल होतील.