मिताली राजचे प्रशिक्षक रमेश पोवारवर गंभीर आरोप

मिताली राजचे प्रशिक्षक रमेश पोवारवर गंभीर आरोप

नवी दिल्ली:  महिला क्रिकेट विश्वचषकातून बाहेर पडलेल्या टीम इंडियाची वादावादी सुरुच आहे. आता भारतीय महिला वन डे आणि कसोटी क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रमेश पोवारने अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार मितालीने केली आहे. मिताली राजने याबाबत बीसीसीआयचे सीईओ राहुल झोहरी यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. मितालीने रमेश पोवारसोबत प्रशासक समितीच्या सदस्य डायना एडुल्जी यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.

भारतीय महिला संघ नुकत्याच झालेल्या महिला टी20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली होती. मात्र खराब फॉर्मचा दावा करत या सामन्यातून मिताली राजला बाहेर बसवण्यात आलं होतं. पण सेमी फायनलमध्ये भारतीय महिला संघाला इंग्लंडकडून हार पत्करावी लागली. त्यानंतरच मितालीला बाहेर का बसवण्यात आलं असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

याबाबत मिताली म्हणते, “मला सेमीफायनलमधून बाहेर बसवण्यामागे एडुल्जी यांचा हात होता”. मितालीच्या या आरोपामुळे देशभरात महिला क्रिकेट संघातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

मितालीने  विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यात अर्धशतकं झळकावलही होती. पण तरीही तिला सेमीफायनलमध्ये संधी दिली नाही. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला 8 विकेट्सने पराभव पत्कारावा लागला,  असे मितालीने बीसीसीआय सीईओ राहुल झोहरी आणि क्रिकेट ऑपरेशन्स जनरल मॅनेजर सबा करीम यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

मितालीने आपल्या पत्रात म्हटलंय, “20 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत मी पहिल्यांदाच इतकी दु:खी आणि निराश झाले आहे. मी देशाची सेवा करुनही काही मोठ्या पदावर बसलेल्या लोकांना त्याची किंमत नाही. ते माझं करिअर संपवत आहेत, शिवाय माझा आत्मविश्वास कमी करत आहेत”.

मला टी 20 ची कर्णधार हरमनप्रीतविरोधात काही बोलायचे नाही. पण मला अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी का मिळाली नाही, असा माझा प्रश्न आहे.  मला पहिल्यांदा देशासाठी वर्ल्डकप जिंकायचा होता. माल वाईट वाटत आहे, वर्ल्डकप टी20मध्ये पराभव पत्कारुन देशाने ही संधी गमावली, असं मितालीने नमूद केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI