CWG 2022 IND vs AUS T20 Preview: महिला क्रिकेट संघाला इतिहास रचण्याची संधी, आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना, ऑस्ट्रेलियाचं पारडं जड

| Updated on: Jul 29, 2022 | 6:48 AM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2008 मध्ये पहिला T20 सामना खेळला गेला होता. ऑस्ट्रेलियाने फक्त 2 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांची विजयी घोडदौड अखंड सुरू राहिली. अधिक जाणून घ्या...

CWG 2022 IND vs AUS T20 Preview: महिला क्रिकेट संघाला इतिहास रचण्याची संधी, आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना, ऑस्ट्रेलियाचं पारडं जड
आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल स्पर्धेला (CWG 2022) आजपासून सुरुवात होत आहे. गुरुवारी दिमाखदार उद्घाटन समारंभ पार पडला. यानंतर आज शुक्रवार 29 जुलैला खेळांचा पहिला दिवस आहे. आजपासून राष्ट्रकुलमधील क्रीडा स्पर्धा सुरू होतील. यामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे क्रिकेटचं पुनरागमन हे देखील आहे. 24 वर्षांनंतर क्रिकेट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत परतत आहे. तेही T20 स्वरूपात. प्रथमच महिला क्रिकेट राष्ट्रकुलचा एक भाग बनला आहे. त्याची सुरुवात धमाकेदारपणे होत आहे. आज भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) सामना रंगणार आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. CWG मध्ये महिला क्रिकेटचा प्रथमच प्रवेश म्हणजे इतिहास घडवण्याची संधी. बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन क्रिकेट मैदानाव आज हा सामना खेळवला जाईल. ग्रुप स्टेजमधील भारताचा हा पहिला आणि कदाचित सर्वात कठीण सामना आहे. साहजिकच भारताचे आव्हानही सोपे नसेल. याची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये पहिले कारण म्हणजे भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड चांगला नाही. मग आता जिंकलो तर टीम इंडियाला CWG मधील महिला क्रिकेटचा पहिला सामना जिंकण्याचा दर्जा मिळेल.

ऑस्ट्रेलियाचं पारडं जड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2008 मध्ये पहिला T20 सामना खेळला गेला होता आणि ऑस्ट्रेलियाने फक्त 2 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांची विजयी घोडदौड अखंड सुरू राहिली आणि विजयाचे अंतरही वाढत गेले. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 23 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताच्या खात्यात फक्त 6 वेळाच यश आले आहे. ऑस्ट्रेलियाने 16 सामने जिंकले आहेत. तर एक अनिर्णित राहिला आहे. भारताला शेवटचा विजय सुमारे अडीच वर्षांपूर्वी 2020 मध्ये झालेल्या T20 विश्वचषकात मिळाला होता. जेव्हा पूनम यादवच्या फिरकीच्या जोरावर भारतानं 17 धावांनी विजय मिळवला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये दोन्ही संघांमधील शेवटचा सामना खेळला गेला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील 3 पैकी दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले, तर एक अनिर्णित राहिला.

कोण तयार आहे?

ऑस्ट्रेलियाने अलीकडच्या काळात फारसे क्रिकेट खेळलेले नाही. CWG च्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियानं आधीच इंग्लंडभोवती तळ ठोकला होता. ऑस्ट्रेलियानं आयर्लंडमध्ये तीन संघांच्या मालिकेत भाग घेतला. त्यात आयर्लंडविरुद्ध दोन विजय मिळवले. तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांवर पावसाचा परिणाम झाला. त्याआधी ऑस्ट्रेलियाने मार्च-एप्रिलमध्येच एकदिवसीय विश्वचषक खेळला होता. अशा स्थितीत संघ पूर्णपणे तयार होऊ शकत नाही.

भारतीय संघ फायदा घेऊ शकतो

अलीकडच्या काळात श्रीलंकेविरुद्ध सलग 6 सामने (तीन वनडे, तीन टी-20) खेळले आणि त्यापैकी 5 जिंकले. भारतीय संघ सुस्थितीत आहे. मात्र, असे असूनही ऑस्ट्रेलियाला कमी लेखता येणार नाही. सध्याच्या T20 आणि एकदिवसीय विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाकडे अ‍ॅलिसा हिली, बेथ मुनी, कर्णधार मेग लॅनिंग, ताहलिया मॅकगार, मेगन शुट यासारखे उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्याचबरोबर भारताकडे कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्माही आहेत. जेमिमा रॉड्रिग्ज, राजेश्वरी गायकवाड अशी नावे आहेत. संघाला अष्टपैलू पूजा वस्त्राकरची उणीव भासणार आहे, जी कोरोना संसर्गामुळे अद्याप बर्मिंगहॅमला गेली नाही.