आयपीएल लिलावाच्या दिवशी भारताच्या या खेळाडूने ठोकल्या 209 धावा, पण…

अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारताने मलेशियाचा 315 धावांनी पराभव केला. या विजयात विकेटकीपर फलंदाज अभिज्ञान कुंडूचा मोलाचा वाटा राहिला. त्याने आक्रमक खेळी करत 121 चेंडूत नाबाद 209 धावा केल्या. पण लिलावात त्याच्यासाठी बोली लागली नाही, कारण...

आयपीएल लिलावाच्या दिवशी भारताच्या या खेळाडूने ठोकल्या 209 धावा, पण...
आयपीएल लिलावाच्या दिवशी भारताकडून खेळताना या खेळाडूने ठोकल्या 209 धावा, पण...
Image Credit source: सोनी स्पोर्ट्स स्क्रीनशॉट/IPL/BCCI
| Updated on: Dec 16, 2025 | 6:49 PM

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. मिनी लिलावात अनकॅप्ड प्लेयर्सने भाव खाल्ला. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोघांसाठी चेन्नई सुपर किंग्सने 28.40 कोटी रुपये मोजले. पण या लिलावादरम्यान अंडर 19 आशिया कप स्पर्धेत अभिज्ञान कुंडूचं वादळ घोंघावलं. त्याने 26 षटकार चौकार मारत 121 चेंडूत द्विशतकी खेळी केली. या स्पर्धेत पहिल्यांदाच कोणत्याही खेळाडूने मारलेलं पहिलं द्विशतक आहे. अभिज्ञान कुंडूने पाचव्या क्रमांकावर उतरून द्विशतकी खेळी केली हे खास वैशिष्ट्य आहे. वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर अभिज्ञान कुंडू मैदानात उतरला होता. पण त्याच्या अंगात वैभवचं वारं भरलं होतं असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. कारण त्याने आक्रमक पवित्रा दाखवला. अर्धशतक ठोकण्यासाठी त्याने 44 चेंडूचा सामना केला. मात्र त्यानंतर पुढच्या 36 चेंडूत शतकी खेळी केली. इतक्यावरच थांबला नाही तर चौकार आणि षटकारांचा वर्षाव सुरुच ठेवला आणि 121 चेंडूत द्विशतक ठोकलं. यावेळी त्याने 9 षटकार आणि 16 चौकार मारले.

भारताकडून खेळताना अभिज्ञान कुंडूने अंडर 19 आशिया कप स्पर्धेत द्विशतकी खेळी करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने त्याने 125 चेंडूत नाबाद 209 धावा केल्या. यासह त्याने बांगलादेशच्या सौम्य सरकारचा विक्रम मोडीत काढला आहे. कारण यापूर्वी हा विक्रम त्याच्या नावावर होता. त्याने 2012 मध्ये 209 धावा केल्या होत्या. पण अभिज्ञान कुंडूने नाबाद 209 धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आयपीएल लिलावात काय झालं?

अभिज्ञान कुंडूने लिलावाच्या दिवशीच द्विशतक ठोकल्याने त्याला भाव मिळेल असं अनेकांना वाटत होतं. दुर्दैव असं की अभिज्ञान कुंडू या लिलावाचा भाग नाही. त्यामुळे त्याच्या बोली लागण्याचा प्रश्न येत नाही. पण या लिलावात असता तर आज कदाचित त्याला भाव मिळाला असता. अष्टपैलू खेळाडू विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान आणि खिलन पटेल यांना मात्र बेस प्राईससह यादीत स्थान देण्यात आले होते. अंडर 19 संघाचा ओपनर फलंदाज वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्स आणि आयुष म्हात्रे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहेत.