Cricket : तिसऱ्या सामन्याआधी दुखापतीमुळे कॅप्टन आऊट! टीमला मोठा झटका

Cricket News : मालिका 1-1 ने बरोबरीत असताना तिसऱ्या आणि निर्णायक सामन्याआधी टीमला मोठा झटका लागला आहे. कर्णधाराला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे.

Cricket : तिसऱ्या सामन्याआधी दुखापतीमुळे कॅप्टन आऊट! टीमला मोठा झटका
najmul hossain shanto and suryakumar yadav
Image Credit source: Bcci
| Updated on: Nov 11, 2024 | 2:50 PM

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो याला दुखापत झाली आहे. शांतो या दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे बांगलादेशला मोठा झटका लागला आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे मालिका विजयाची बरोबरी संधी आहे. मात्र त्याआधीच शांतोला दुखापतीमुळे बाहेर पडावं लागणं हा बांगलादेशसाठी झटका आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील हा तिसरा सामना सोमवारी 11 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार शांतोला कंबरदुखीमुळे बाहेर व्हावं लागलंय. शांतोला या दुखापतीतून सावरण्यासाठी 2 आठवडे लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. शांतोला अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. शांतोला या दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर मेहदी हसनने नेतृत्व केलं.बांगलादेश मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असताना शांतोने दुसऱ्या सामन्यात निर्णायक खेळी केली होती. शांतोने 76 धावा करत बांगलादेशच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती.

कसोटी मालिकेला मुकणार?

दरम्यान बांगलादेश या एकदिवसीय मालिकेनंतर विंडिज दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. या दौऱ्याला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने सुरुवात होणार आहे. बांगलादेशने या कसोटी मालिकेसाठी शांतोला कर्णधार केलं आहे. आता शांतोला कंबरदुखीमुळे 2 आठवड्याची विश्रांती सांगितली आहे. पहिला सामना हा 22 ते 26 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. त्यामुळे शांतो या पहिल्या सामन्यात खेळणार का? याकडे बांगलादेश टीमचं लक्ष असेल.

बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनजीद हसन, सौम्या सरकार, मेहिदी हसन मिराझ, तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली (विकेटकीपर), नसुम अहमद, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, झाकीर हसन, रिशाद हुसेन आणि नाहिद राणा.

अफगाणिस्तान टीम: हशमतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, अल्लाह गझनफर, नांगेयालिया खरोटे, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, इक्रम अलीखिल, दारिश रसूली, रियाझ हसन, नूर अहमद, अब्दुल मलिक, बिलाल सामी आणि नावेद झद्रान.