अफगाणिस्तान भारतात पहिला कसोटी सामना खेळणार, पण समोर टीम इंडिया नाही तर…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानने जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली होती. आता अफगाणिस्तान संघ पहिला कसोटी सामना खेळण्यास सज्ज झाला आहे. सप्टेंबर महिन्यात अफगाणिस्तान संघ पहिला कसोटी सामना खेळणार असल्याची माहिती आहे.

अफगाणिस्तान भारतात पहिला कसोटी सामना खेळणार, पण समोर टीम इंडिया नाही तर...
| Updated on: Jul 23, 2024 | 5:40 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली होती. तसेच उपांत्य फेरीत जागा मिळवून आश्चर्याचा धक्का दिला होता. अफगाणिस्तानचा प्रवास उपांत्य फेरीतच संपला असला तरी कामगिरीने लक्ष वेधून घेतलं होतं. आता कर्णधार राशिद खानच्या नेतृत्त्वात अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच भारतात कसोटी सामना खेळणार आहे. पण हा सामना भारताविरुद्ध नसणार आहे. अफगाणिस्तान यजमान म्हणून हा सामना खेळणार असून हा सामना ग्रेटर नोएडात होणार आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून संघाने मायदेशात कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. आता अफगाणिस्तान संघ भारतीय भूमीवर न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्याच्या तयारीत आहे.अफगाणिस्तान एकमेव कसोटी सामना न्यूजीलंडविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये क्रिकेट इतिहासातील हा पहिला कसोटी सामना असणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआने अफगाणिस्तान क्रिकेट संघाला तीन ठिकाणी सामना खेळण्यासाठी परवानगी दिली आहेत. यात ग्रेटर नोएडा, कानपूर आणि लखनऊ ही ठिकाणं आहेत.

अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटला अधिकाअधिक प्राधान्य मिळावं यासाठी बीसीसीआयकडून मदतीचा हात दिला गेला आहे. यापूर्वीही अफगाणिस्तान संघ ग्रेटर नोएडात मालिका खेळला आहे. बीसीसीआयने 2015 मध्ये अफगाणिस्तानला हे ठिकाण जाहीर केलं होतं. ग्रेटर नोएडात जुलैमध्ये अफगाणिस्तानला बांग्लादेशविरुद्ध तीन वनडे, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळायचे होते. पण उकाड्यामुळे ही मालिका झाली नाही. अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आतापर्यंत फक्त 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात 3 सामने जिंकले असून 6 सामने गमावले आहेत.

न्यूझीलंडला भारतासोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिकाही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्याच्या शेवटी न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान हा कसोटी सामना होईल, असं सांगण्यात येत आहे. पण या सामन्याचा निकालाचा कोणताही परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर होणार नाही. कारण अफगाणिस्तान संघ या मालिकेचा भाग नाही. पण त्यानंतर होणारी भारत-न्यूझीलंड ही कसोटी मालिका टीम इंडियासाठी खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेवर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं भवितव्य अवलंबून आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us