Anand Mahindra : मोहम्मद सिराज याच्या खेळीनंतर आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले…
Anand Mahindra :आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम मोहम्मद सिराज याने जबरदस्त कामगिरी केली. श्रीलंकेचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला आणि भारताचा विजय सोपा करून दिला. दुसरीकडे सामनावीराच्या पुरस्काराचे पैसे ग्राउंड्समॅनना देऊन सर्वांची मनं जिंकली.

मुंबई : भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत आशिया कप नावावर केला आहे. भारताने आठव्यांदा आशिया कप चषकावर नाव कोरलं आहे. श्रीलंकेला अवघ्या 50 धावांवर सर्वबाद करत विक्रम केला. तसेच भारताने 10 गडी राखून आव्हान गाठलं. या सामन्यात मोहम्मद सिराज याने 21 धावा देत 6 गडी बाद केले. या चमकदार कामगिरीसाठी मोहम्मद सिराज याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून 4 लाखांची रक्कम मिळाली. ही संपूर्ण रक्कम मोहम्मद सिराज याने ग्राउंड स्टाफला दिली. त्याच्या या कृतीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही मोहम्मद सिराज याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाले आनंद महिंद्रा?
आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत लिहिलं की, “मला वाटत नाही की याआधी आमच्या विरोधकांसाठी माझे हृदय कधी रडले असेल… जणू काही आम्ही त्यांच्यावर अलौकिक जादू केली आहे… मोहम्मद सिराज तुम्ही मार्वल अॅव्हेंजर आहात…. ” दुसरीकडे, आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला आहे. युजर्संनी आनंद महिंद्रा यांच्याकडे अजब मागणी केली. नवी एसयुव्ही गिफ्ट करण्याची मागणी केली. एका युजरने लिहिलं की, सिराजला एक एसयुव्ही द्या. या पोस्टवर रिप्लाय देताना आनंद महिंद्रा यांनी सांगितलं की, तशी सोय करण्यात आली आहे.
I don’t think I have EVER before felt my heart weep for our opponents….It’s as if we have unleashed a supernatural force upon them… @mdsirajofficial you are a Marvel Avenger… https://t.co/DqlWbnXbxq
— anand mahindra (@anandmahindra) September 17, 2023
Been there, done that… https://t.co/jBUsxlooZf
— anand mahindra (@anandmahindra) September 17, 2023
यापूर्वी दिली होती एसयुव्ही
मोहम्मद सिराज याच्या घरी लवकरच एसयुव्ही कार येईल, अशी आशा वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी आनंद महिंद्रा यांनी यापूर्वीही मोहम्मद सिराजला एसयुव्ही दिली आहे. 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या सिराजसह सहा क्रिकेटपटूंना थार एसयुव्ही गिफ्ट दिली होती. यावेळी सिराजने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून आभार व्यक्त केले होते.
या खेळाडूंना मिळाली आहे एसयुव्ही
आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम महिंद्रा ग्रुप करते. आनंद महिंद्रा यांनी भारतीय बुद्धिबळपटू प्रज्ञानानंद याला इलेक्ट्रिक एसयुव्ही महिंद्र एक्सयुव्ही400 गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. प्रज्ञानानंतने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारणारा सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर आहे.