सिडनी कसोटीत राडा! बेन स्टोक्स आणि लाबुशेन भिडले Video Viral

एशेज कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सिडनीत सुरु आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने 3-1 ने आधीच जिंकली आहे. पण इंग्लंड शेवटचा कसोटी सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात आहे. असं असताना या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानात वाद पाहायला मिळाला.

सिडनी कसोटीत राडा! बेन स्टोक्स आणि लाबुशेन भिडले Video Viral
सिडनी कसोटी राडा! बेन स्टोक्स आणि लाबुशेन भिडले Video Viral
Image Credit source: X/ Video Grab
| Updated on: Jan 05, 2026 | 7:11 PM

एशेज कसोटी मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना सिडनीत सुरु आहे. दोन दिवसांचा खेळ संपला असून सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकलेला आहे. असं असताना दुसऱ्या दिवशी मैदानात एक वाद पाहायला मिळाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन आमनेसामने आले. तिसऱ्या सेशनमध्ये या दोघांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मैदानात काही काळ वातावरण तापलेलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्णधार बेन स्टोक्स षटक टाकत होता आणि षटक संपल्यावर स्टोक्स लाबुशेनच्या बाजूने गेला. तेव्हा स्टोक्सने त्याला डिवचलं. त्यानंतर स्टोक्सने त्याच्या खांद्यावर हात ठेवून काही तरी बोलला. त्यानंतर लाबुशेनच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याचं दिसलं. यावेळी दोघेही आक्रमक असल्याचं दिसून आलं.

एशेज कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी दोघांमध्ये काही वेळ शा‍ब्दिक चमकक झाली. त्यामुळे पंचांना मध्यस्थी करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पंचांनी कसंबसं हे प्रकरण मिटवलं. पण स्टोक्सला या वादाचा पुरेपूर फायदा झाला. कारण स्टोक्सच्या गोलंदाजीवर मार्नस लाबुशेनने बेजबाबदार खेळी केली आणि जॅकब बेथलच्या हाती झेल देऊन बाद झाला. स्टोक्सने 31व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याची विकेट काढली. स्टोक्सच्या जाळ्यात लाबुशेन अलगद अडकला असंच दिसलं. लाबुशनने 68 चेंडूत 7 चौकार मारत 48 धावांची खेळी केली. त्याच्या अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकलं.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सर्व गडी गमवून 384 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 2 गडी गमवून 166 धावा केल्या आहेत. अजूनही ऑस्ट्रेलियाचा संघ 218 धावांनी पिछाडीवर आहे. पण ट्रेव्हिस हेड हा शतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे इंग्लंडची डोकेदुखी तिसऱ्या दिवशी वाढणार आहे. त्याला झटपट बाद करण्याचं आव्हान असणार आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ट्रेव्हिस हेड 87 चेंडूत 15 चौकार मारत नाबाद 91 आणि मिचेल नेसर 15 चेंडूत नाबाद 1 धाव करून तंबूत परतले आहेत. आता तिसऱ्या दिवशी कोणता संघ वरचढ ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.