
मुंबई | आशिया कप स्पर्धेच्या आयोजनावरुन गेल्या अनेक महिन्यांपासून वाद रगंला होता. टीम इंडियाचा पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार असल्याने अनेक महिने आयोजनावरुन खलबतं सुरु होती. अखेर या आशिया कप स्पर्धेच्या आयोजनाच्या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. आशिआई क्रिकेट काऊन्सिलने आशिया कप स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेत टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामेन येणार हे निश्चित झालं आहे. विशेष गोष्ट म्हणजे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हे दोन्ही कडवट प्रतिस्पर्धी या स्पर्धेत एकूण 3 वेळा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
आशिया कप स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. या 6 संघाना 2 ग्रुपमध्ये विभागण्यात आलंय. या स्पर्धेत 13 सामने खेळवण्यात येणार आहेत. या 13 पैकी 9 सामने हे श्रीलंकेत पार पडतील. तर फक्त 4 सामन्यांसाठीच पाकिस्तानला यजमानपदाचा मान देण्यात आला आहे.
आशिया कप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तानचा समावेश आहे. त्यामुळे टीम इंडिया-पाकिस्तान साखळी फेरीत आमनेसामने येणार हे नक्की आहे. त्यानंर साखळी फेरीतून प्रत्येक ग्रुपमधून 2 असे एकूण 2 ग्रुपमधून 4 टीम सुपर 4 राउंडमध्ये पोहचतील. टीम इंडिया आणि पाकिस्तान सुपर 4 मध्ये पोहचल्यास पुन्हा एकदा सामना रंगेल.
गेल्या आशिया कप स्पर्धेनुसार, सुपर 4 मध्ये पोहचणारी टीम प्रत्येक टीम विरुद्ध सामना खेळली होती.त्यानुसार टीम इंडिया आणि पाकिस्तान सुपर 4 मध्ये आल्यास इथे 1 सामना होईल. यानंतर टीम इंडिया आणि पाकिस्तान सुपर 4 मध्ये टॉप 2 वर असल्यास फायनलमध्ये भिडतील. अशाप्रकारे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या आशिया कप स्पर्धेत एकूण 3 वेळा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
आशिया कप स्पर्धा ही यंदा 50 षटकांची असणार आहे. या स्पर्धेतील सहभागी एकूण 6 संघांना 2 गटात विभागण्यात आलंय. त्यानुसार ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ हे 3 संघ आहेत. तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 टीम आहेत. दोन्ही ग्रुपमधून एकूण 4 संघ सुपर 4 साठी पात्र ठरतील. यंदा नेपाळचा क्रिकेट संघ इतिहास रचून 2023 च्या आशिया कपसाठी पात्र ठरला आहे.
दरम्यान आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे स्पर्धेतील सामन्यांच्या वेळापत्रकाकडे लागून राहिलंय. त्यातही टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या कट्टर आणि चीर प्रतिद्वंदी संघामध्ये कधी आणि कुठे सामना आयोजित केला जाणार, याकडे क्रिकेट विश्वाचं बारीक लक्ष असणार आहे.