Asia Cup 2025 : हार्दिक पंड्याला मोठ्या विक्रमाची संधी, फक्त 5 सिक्सची गरज, नक्की रेकॉर्ड काय?

Asia Cup 2025 : कुंग फु पंड्या म्हणून ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आशिया कप स्पर्धेत खास कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. भारतासाठी आतापर्यंत एकूण 3 फलंदाजांनाच अशी कामगिरी करता आली आहे.

Asia Cup 2025 : हार्दिक पंड्याला मोठ्या विक्रमाची संधी, फक्त 5 सिक्सची गरज, नक्की रेकॉर्ड काय?
Hardik Pandya Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 04, 2025 | 2:30 AM

आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा यूएईकडे आहे. या स्पर्धेत 8 संघ भिडणार आहेत. या 8 संघांची 4-4 प्रमाणे 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, यूएई आणि ओमान हे 4 संघ अ गटात आहेत. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि हाँगकागँचा समावेश आहे. भारतीय संघ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात या स्पर्धेत खेळणार आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना हा यजमान यूएई विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत भारताचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याच्याकडे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्या पंगतीत स्थान मिळवण्याची संधी आहे.

स्टार ऑलराउंडर हार्दिक याला भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये 100 षटकार लगावणारा चौथा फलंदाज होण्याची संधी आहे. आतापर्यंत भारतासाठी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली या तिघांनीच 100 पेक्षा अधिक षटकार लगावले आहेत.

भारतासाठी टी 20i मध्ये सर्वाधिक षटकार

रोहित शर्मा – 205 सिक्स

सूर्यकुमार यादव – 146 सिक्स

विराट कोहली – 124 सिक्स

केएल राहुल – 99 सिक्स

हार्दिक पंड्या – 95 सिक्स

हार्दिकची टी 20i कारकीर्द

हार्दिकने भारताचं 114 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच हार्दिकने यापैकी काही सामन्यांमध्ये नेतृत्वही केलंय. हार्दिकने टी 20i कारकीर्दीतील 114 सामन्यांमधील 90 डावांत 1 हजार 812 धावा केल्या आहेत. हार्दिकने या दरम्यान 5 अर्धशतकं झळकावली आहेत. हार्दिकने टी 20i कारकीर्दीत 135 चौकार आणि 95 षटकार लगावले आहेत. त्यामुळे हार्दिकला आता षटकारांच्या शतकासाठी केवळ 5 सिक्सची गरज आहे. हार्दिक 5 षटकार लगावताच भारतासाठी 100 सिक्स लगावणारा चौथा फलंदाज ठरेल.

हार्दिकची आशिया कप स्पर्धेतील कामगिरी

दरम्यान हार्दिकने आतापर्यंत टी 20 आशिया कप स्पर्धेत एकूण 8 सामने खेळले आहेत. हार्दिकने या 8 सामन्यांमध्ये 16.60 च्या सरासरीने एकूण 83 धावा केल्या आहेत. तसेच हार्दिकने 18.81 च्या सरासरीने 11 फलंदाजांना बाद केलं आहे. त्यामुळे हार्दिककडून यंदा आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

टीम इंडिया या स्पर्धेत 10, 14 आणि 19 सप्टेंबरला साखळी फेरीतील आपले 3 सामने खेळणार आहे. भारतीय संघ अनुक्रमे यूएई, पाकिस्तान आणि ओमान विरुद्ध भिडणार आहे. मात्र क्रिेकेट चाहत्यांना 14 सप्टेंबरला होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची प्रतिक्षा आहे.