
आशिया कप 2025 स्पर्धेत प्रमुख संघांनी विजयी सुरुवात केली आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील 4 सामने खेळवण्यात आले आहेत. अफगाणिस्तान, टीम इंडिया, बांगलादेश आणि पाकिस्तान या 4 संघांनी या मोहिमेत विजयी सुरुवात केली आहे. आता या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. बांगलादेशचा हा या स्पर्धेतील दुसरा तर श्रीलंकेचा पहिलाच सामना असणार आहे. बांगलादेशने या स्पर्धेत विजय मिळवला आहे. त्यामुळे बांगलादेशचा श्रीलंकेवर मात करत सुपर 4 मध्ये धडक देण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेला विजयी सुरुवात करायची असेल तर बांगलादेशला रोखावं लागणार आहे. त्यामुळे उभयसंघातील या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चढाओढ पाहायला मिळणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती सविस्तर जाणून घेऊयात.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना शनिवारी 13 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये होणार आहे.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपद्वारे मोबाईलवर लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.
बांगलादेशने 11 सप्टेंबरला हाँगकाँगचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत या स्पर्धेत विजयी सुरुवात केली होती. हाँगकाँगने विजयासाठी दिलेलं 144 धावांचं आव्हान बांगलादेशने 17.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. बांगलादेशला विजयी करण्यात कर्णधार लिटन दास याने प्रमुख भूमिका बजावली. लिटनने 39 बॉलमध्ये 59 धावा केल्या. बांगलादेशचा या विजयामुळे विश्वास वाढला आहे. त्यामुळे बांगलादेश-श्रीलंका सामना रंगतदार होईल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
दरम्यान बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 20 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. श्रीलंकेने या 20 पैकी 12 सामन्यांमध्ये बांगलादेशला पराभूत केलं आहे. तर बांगलादेशनेही 8 सामन्यांमध्ये पलटवार करत आपली ताकद दाखवून दिलीय. त्यामुळे उभयसंघातील 21 व्या टी 20i सामन्यात कोण मैदान मारणार? याची प्रतिक्षा चाहत्यांना आहे.