
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला आता मोजून काही तास बाकी आहेत. दोन्ही शेजारी संघांनी या सामन्यासाठी कंबर कसली आहे. दोन्ही संघांनी आशिया कप 2025 स्पर्धत विजयी सुरुवात केलीय. त्यामुळे दोन्ही संघांचा विश्वास दुणावला आहे. भारताने यूएईवर मात केली. तर पाकिस्तानने नवख्या ओमानवर सहज मात केली आणि विजयाचं खातं पहिल्याच सामन्यात उघडलं. आता भारत आणि पाकिस्तान या मोहिमेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. साऱ्या क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची प्रतिक्षा आहे.
टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पाकिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे. तर सलमान अली आगा याच्याकडे पाकिस्तानच्या नेतृत्वाची धुरा आहे. क्रिकेट चाहते सामन्यासाठी उत्सूक आहेत. मात्र या सामन्यात हवामानाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अनेकदा सामन्याआधी आणि सामन्यादरम्यान हवामानामुळे व्यत्यय येतो. परिणामी सामना पूर्ण होत नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा होते. त्यामुळे वेदर अर्थात हवामानाची भूमिका प्रत्येक सामन्यात निर्णायक ठरते. त्यामुळे सामन्याआधी दोन्ही संघांचं हवामानाकडं लक्ष असतं. कारण हवामानानुसार परिस्थिती बदलते. त्याचा परिणाम सामन्यावर होतो. त्यामुळे टीम मॅनेजमेंट आणि विशेष करुन कर्णधारांची हवामानाकडे लक्ष असतं.भारत-पाक महामुकाबल्यानिमित्ताने रविवारी 14 सप्टेंबरला हवामान कसं असणार? हे जाणून घेऊयात.
एक्युवेदरनुसार, दुबईत रविवारी उष्म हवामान असणार आहे. रविवारी दिवसा तापमान 39 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. मात्र ओलाव्यामुळे हे तापमान 44 अंश सेल्सिअस असल्यासारखं वाटेल. उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. तसेच हवेचा दर्जा खराब असेल.
आकाश निरभ्र राहील. रविवारी रात्री खूप गरम होईल. मात्र हवामान साफ असेल. तापमान 30 अंश सेल्सिअस पर्यंत घसरेल. तसेच रविवारी पावसाची शक्यता नाही, अशी माहिती एक्युवेदरकडून देण्यात आली आहे. एक्युवेदरने दिलेल्या माहितीत पावसाची शक्यता नसल्याचं स्पष्ट म्हटलंय. त्यामुळे हा सामना कोणत्याही अडथळ्याशिवाय होणार, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.
भारताने पाकिस्तान विरुद्ध 13 पैकी 10 टी 20i सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने 3 वेळा भारतावर मात केली आहे. टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध कायम दबदबा राहिला आहे. मात्र पाकिस्तान कधी काय करेल सांगता येत नाही. पाकिस्तानने 2021 च्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत दुबईतील स्टेडियममध्ये टीम इंडियावर एकतर्फी विजय मिळवला होता. पाकिस्तानने भारतावर 10 विकेट्सने मात केली होती. त्यामुळे दुबईत उभयसंघात रविवारी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.