
आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर 4 फेरीतील सहाव्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना असणार आहे. तसेच या सामन्यानिमित्ताने दोन्ही संघ यंदा पहिल्यांदाच आमनेसामने असणार आहेत. टीम इंडियाने याआधीच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना फक्त औपचारिकताच आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून सलग सहावा विजय मिळवण्याची संधी आहे. तर श्रीलंकेचा मोहिमेची सांगता विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सुपर 4 सामना शुक्रवारी 26 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सुपर 4 सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सुपर 4 सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सुपर 4 सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे मॅच पाहता येईल. तसेच tv9 marathi.com या वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.
टीम इंडियाने साखळी फेरीत 3 आणि सुपर 4 मध्ये 2 असे एकूण 5 सामने सलग जिंकले आहेत. त्यामुळे श्रीलंकेला जिंकायचं असेल तर टीम इंडियाचा विजय रथ रोखावा लागेल. मात्र श्रीलंकेसाठी हो सोपं नसेल. तसेच टीम इंडियाचा फायनलआधी हा शेवटचा सामना आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी तयारीच्या दृष्टीने सामना महत्त्वाचा असणार आहे. सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. तर चरिथ असलंका श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
दरम्यान श्रीलंकाच टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरु शकते, असं या स्पर्धेच्या सुरुवातीआधी म्हटलं जात होतं. श्रीलंका साखळी फेरीपर्यंत अजिंक्य होती. श्रीलंकेने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले होते. त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातच अंतिम सामना होणार, असा चाहत्यांचा अंदाज होता. मात्र श्रीलंकेची सुपर 4 फेरीत निराशाजनक सुरुवात झाली. श्रीलंकेला आधी बांगलादेशने पराभूत केलं. त्यानंतर श्रीलंकेला दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानल विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता श्रीलंका जाता जाता विजय मिळवून टीम इंडियाला रोखण्यात यशस्वी होणार का? याकडे श्रीलंकेच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.