
यूएईमध्ये 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समितीने मंगळवारी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादव या 15 सदस्यीय भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि शुबमन गिल या दोघांचं टी 20i संघात पुनरागमन झालं आहे. शुबमन गिल याला पुनरागमनासह उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच संजू सॅमसन गेल्या अनेक टी 20i मालिकांमध्ये भारतासाठी ओपनिंग करत आहे. मात्र गिलच्या कमबॅकमुळे आता संजूच्या बॅटिंग पोझिशनमध्ये बदल करण्यात येऊ शकतो. या निमित्ताने संजू आणि शुबमन या दोघांपैकी टी 20i मध्ये बेस्ट ओपनर कोण? हे आकडेवारीच्या माध्यामातून जाणून घेऊयात.
शुबमनने आतापर्यंत भारताचं एकूण 21 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. गिलने या 21 सामन्यांमध्ये 30.42 च्या सरासरीने आणि 139.28 अशा स्ट्राईक रेटने 579 धावा केल्या आहेत. गिलने टी 20i क्रिकेटमध्ये 3 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावलं आहे. तर गिलची नॉट आऊट 126 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
संजूने आतापर्यंत भारतासाठी अनेक टी 20i मालिकांमध्ये ओपनिंग केली आहे. संजू एकूण 17 टी 20i सामन्यांमध्ये सलामीला खेळला आहे. संजूने या दरम्यान 32.63 च्या सरासरीने आणि 178.77 च्या स्ट्राईक रेटने 522 धावा केल्या आहेत. तसेच संजूने 3 शतकं आणि 1 अर्धशतक ठोकलं आहे.
अजित आगरकर यांनी मंगळवारी संजू सॅमसनबाबत प्रतिक्रिया दिली. त्यामुळे संजूला ओपनर म्हणून खेळण्याची संधी मिळणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. “शुबमन आणि यशस्वी जैस्वाल उपलब्ध नसल्याने संजूला ओपनिंग करण्याची संधी मिळाली”, असं आगरकर यांनी म्हटलं. त्यामुळे संजूला ओपनर म्हणून संधी मिळणार की नाही? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
“अभिषेक शर्मा याच्यासह ओपनर म्हणून संजू आणि गिल हे 2 चांगले पर्याय आहेत. दुबईला पोहचल्यानंतर कॅप्टन आणि कोच याबाबत निर्णय घेतील”, असंही आगरकरने म्हटलं.
दरम्यान टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेतील आपला पहिला सामना हा 10 सप्टेंबरला खेळणार आहे. भारत यूएई विरुद्ध भिडणार आहे. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध 14 सप्टेंबरला 2 हात करणार आहे. तर भारताचा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 19 सप्टेंबरला ओमान विरुद्ध होणार आहे.