रोहितच्या नेतृत्वात टीम इंडिया विजयी, Prime Ministers XI चा 6 विकेट्सने धुव्वा
Prime Ministers XI vs India : भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया पीएम इलेव्हनचा 46 ओव्हरच्या सामन्यात 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर इलेव्हनवर शानदार विजय मिळवला आहे. कॅनबेरा येथील मानुका ओव्हल येथे झालेल्या या सराव सामन्यात भारताला विजयासाठी 241 धावांचं आव्हान मिळालं होतं. भारताने हे आव्हान 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. तसेच 46 षटकांपर्यंत भारताने 5 विकेट्स गमावून 257 धावा केल्या. दुसरा कसोटी सामना हा डे नाईट असून गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. त्या सामन्याच्या अनुषंगांने सराव व्हावा, या उद्देशाने 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान 2 दिवसीय सराव सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी (1 डिसेंबर) 50 षटकांचा खेळ होणार असल्याचं निश्चित झालं. मात्र खेळाला सुरुवात झाल्यानंतर पावसाने खोडा घातला. त्यामुळे 46 ओव्हरचा सामना होणार असल्याचं निश्चित झालं आणि भारताने हा सामना जिंकला.
सामन्यात काय झालं?
कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून चेसिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर ईलेव्हनच्या 3 फलंदाजांचा अपवाग वगळता टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इतरांनी गुडघे टेकले. सॅम कोन्स्टास याने सर्वाधिक 107 धावांचं योगदान दिलं. तर हॅनो जेकब्स 61 आणि जॅक क्लेटन याने 40 धावांचं योगदान दिलं. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर ईलेव्हनने 43.2 ओव्हरमध्ये 240 धावा केल्या. टीम इंडियाकडून हर्षित राणा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात टीम इंडियाने 46 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 257 धावा केल्या. प्रत्येकाला दुसऱ्या सामन्याआधी सरावाची संधी मिळावी म्हणून एकूण 8 भारतीय खेळाडूंनी फलंदाजी केली. सहकाऱ्यांना बॅटिंगची संधी मिळावी यासाठी टीम इंडियाचे 2 फलंदाज रिटायर्ड होऊन मैदानाबाहेर गेले.
टीम इंडियासाठी दुखापतीनंतर परतलेल्या शुबमन गिल याने सर्वाधिक धावा केल्या. शुबमन गिलने 62 बॉलमध्ये 7 फोरसह 50 रन्स केल्या. गिल त्यानंतर रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला. ओपनर यशस्वी जयस्वाल याने 45 तर केएल राहुल याने 27 धावांचं (रिटायर्ड हर्ट) योगदान दिलं. कॅप्टन रोहित शर्मा 3 धावा करुन माघारी परतला. नितीश रेड्डी याने 42 धावा केल्या. रवींद्र जडेजाने 27 धावांचं योगदान दिलं. सर्फराज खान 1 धावेवर बाद झाला. तर वॉशिंग्टन सुंदर आणि देवदत्त पडीक्कल ही जोडी नाबाद परतली. वॉशिंग्टन सुंदरने 42 तर देवदत्तने 4 धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर ईलेव्हन : जॅक एडवर्ड्स (कर्णधार), मॅट रेनशॉ, जॅक क्लेटन, ऑलिव्हर डेव्हिस, जेडेन गुडविन, सॅम हार्पर (विकेटकीपर), चार्ली अँडरसन, सॅम कोन्स्टास, स्कॉट बोलँड, लॉयड पोप, हॅनो जेकब्स, महली बियर्डमन, एडन ओ कॉनर, जेम रायन आणि जॅक निस्बेट.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद कृष्णा, सिराज , आकाश दीप, हर्षित राणा, सर्फराज खान, अभिमन्यू ईश्वरन आणि देवदत्त पडिक्कल.
