
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी 20i सामना हा गुरुवारी 6 नोव्हेंबरला होणार आहे. उभयसंघातील 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे मालिका विजयाच्या हिशोबाने चौथा सामना निर्णायक असा आहे. हा सामना क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हल येथे होणार आहे. टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केल्यानंतर टीम इंडियाने विजयाचं खातं उघडलं. आता चौथ्या सामन्यातून टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल याला वगळण्याची चर्चा सुरु झाली आहे.
कोणत्याही सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये कर्णधार आणि उपकर्णधाराची जागा निश्चित असते. मात्र शुबमन गिल याने या मालिकेत काही खास केलं नाही. शुबमनला पहिल्या 3 सामन्यांमध्ये त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे शुबमनला चौथ्या सामन्यातून बाहेर करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सलामी फलंदाजांवर संघाला वेगवान आणि तडाखेदार सुरुवात करुन देण्याची जबाबदारी असते. अभिषेक शर्मा भारतासाठी सातत्याने धावा करत आहे. मात्र शुबमनला धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. शुबमनने मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांमध्ये एकूण 57 धावा केल्या आहेत. तसेच शुबमनला आशिया कप 2025 स्पर्धेपासून आतापर्यंत सलग 10 टी 20i सामन्यांमध्ये एकदाही अर्धशतकही करता आलेलं नाही. शुबमनसाठी ही कामगिरी वैयक्तिकरित्या आणि संघासाठीही चिंताजनक आहे.
टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याने शुबमनला प्लेइंग ईलेव्हनमध्ये घेण्यासाठी संजू सॅमसन याच्या ओपनिंज पोजिशनमध्ये बदल केला. संजू सॅमसन शुबमनआधी ओपनिंग करायचा. मात्र शुबमनच्या कमबॅकनंतर संजूला ओपनिंगऐवजी त्या खालील स्थानी खेळवलं. संजूने गेल्या काही मालिकेत ओपनिंगला खोऱ्याने धावा केल्यात. मात्र त्यानंतरही कॅप्टन सूर्या आणि कोच गंभीर यांनी शुबमनसाठी संजूच्या जागेत बदल केला. मात्र त्या बदलाचा आतापर्यंत तरी काही खास फरक पडलेला दिसत नाही.
संजूची मिडल ऑर्डरमधील आकडेवारी काही खास नाही. मात्र त्यानंतरही संजूला मिडल ऑर्डरमध्ये टाकण्यात आलं. त्यात संजू सॅमसन याला तिसर्या सामन्यातून वगळण्यात आलं. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट शुबमनला वगळण्याचा निर्णय घेणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुबमन गिल/संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंह.