
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20i मालिका रंगतदार स्थितीत आहे. उभयसंघातील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा सामना जिंकला. भारताने तिसऱ्या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यामुळे आता चौथ्या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे. या चौथ्या सामन्याचं आयोजन हे क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे.
उभयसंघातील चौथ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 15 मिनिटांनी टॉस झाला. ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन मिचेल मार्श याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. टीम इंडियाने विजयी प्लेइंग ईलेव्हनसह उतरण्याचा निर्णय घेतलाय. तर दुसर्या बाजूला ऑस्ट्रेलियाने तब्बल 4 बदल केले आहेत. एडम झॅम्पा, ग्लेन मॅक्सवेल, जोश फिलीप आणि बेन द्वारशुइस या चौघांचा समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया टीम मायदेशात अवघ्या काही दिवसांनी इंग्लंड विरुद्ध प्रतिष्ठेची एशेस सीरिज खेळणार आहे. त्या मालिकेच्या पूर्वतयारीसाठी टीम मॅनेजमेंटने टी 20i मालिकेतील प्रमुख खेळाडूंना मुक्त केलं आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 बदल करण्यात आले आहेत.
ओपनर ट्रेव्हीस हेड याच्या जागी मॅथ्यू शॉर्ट याला संधी देण्यात आली आहे. तसेच टीम इंडियाचा जावई आणि ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याचं 3 महिन्यांनी कमबॅक झालं आहे. मॅक्सवेल याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा ऑगस्टमध्ये खेळला होता. दरम्यानच्या काळात मॅक्सवेलला दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर रहावं लागलं होतं.
मधल्या फळीत मिचेल ओवन नसल्याने त्याच्या जागी जॉश फिलीप याला संधी मिळाली आहे. तसेच मॅट कुहनमॅन याच्या जागी स्पिनर एडम झॅम्पा याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेव्हीयर बार्टलेट, नॅथन एलिस आणि एडम झॅम्पा.