
टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारतीय संघाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका ही 1-2 अशा फरकाने गमावली. त्यानंतर 29 ऑक्टोबरपासून 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेला सुरुवात झाली. मात्र पहिल्याच सामन्यात चाहत्यांची निराशा झाली. पहिल्या सामन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला.
भारतीय फलंदाजांनी पहिल्या सामन्यात जोरदार फटकेबाजी केली होती. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं होतं. पावसामुळे 20 ऐवजी 18 षटकांचा सामना करण्यात आला. भारताने 9.4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 97 रन्स केल्या होत्या. भारताची या सामन्यात मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरु होती. मात्र पावसामुळे हा सामना नाईलाजाने रद्द करावा लागला. त्यामुळे आता 4 सामन्यांद्वारे मालिकेचा निकाल लागणार आहे.
उभयसंघातील दुसरा सामना हा शुक्रवारी 31 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये होणार आहे. या निमित्ताने भारताची या मैदानातील ऑस्ट्रेलिया विरुद्धची कामगिरी कशी राहिली आहे? हे आपण आकडेवारीद्वारे जाणून घेऊयात. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 4 टी 20I सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने त्यापैकी किती सामने जिंकलेत? हे समजून घेऊयात.
भारताने या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 पैकी 2 टी 20I सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाला 1 सामनाच जिंकता आला आहे. तसेच 1 सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
भारताला 2008 साली मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 8 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर भारताने 2012 आणि 2016 साली विजय मिळवला होता. तर उभयसंघात या मैदानात 2018 साली अखेरचा टी 20I सामना आयोजित करण्यात आला होता. मात्र पावसामुळे तो सामना रद्द करावा लागला होता.
तसेच भारताने ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त पाकिस्तान आणि झिंबाब्वे विरुद्ध या मैदानात प्रत्येकी 1-1 सामना खेळला आहे. भारताने पाकिस्तान आणि झिंबाब्वेला पराभूत केलं होतं. भारताने अशाप्रकारे या मैदानात एकूण 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत.
दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने या मैदानात एकूण 15 टी 20I सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने त्यापैकी 9 सामने जिंकले आहेत. तर 5 वेळा ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आहे. त्यामुळे आकडे पाहता भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांची या मैदानात उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे.