
टीम इंडिया आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 13 वा आणि आपला चौथा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया आपल्या चौथ्या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना रविवारी 12 ऑक्टोबरला होणार आहे. सामन्याचं आयोजन हे विशाखापट्टणममध्ये करण्यात आलं आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीला या सामन्यात महारेकॉर्ड करण्याची संधी आहे. हरमनप्रीतकडे वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. हरमनप्रीतला या विक्रमासाठी फक्त 4 षटकारांकारीच गरज आहे.
सध्या वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक सिक्स लगावण्याचा विक्रम हा न्यूझीलंडची फलंदाज सोफी डीव्हाईन हीच्या नावावर आहे. सोफीने या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 23 षटकार लगावले आहेत. सोफीने 28 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. हरमनप्रीत या स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. हरमनने 29 सामन्यांमध्ये 20 षटकार खेचले आहेत. त्यामुळे हरमनप्रीतला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी 4 षटकारांची गरज आहे.
हरमनप्रीतला यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत काही खास करता आलं नाही. हरमनप्रीतला 3 सामन्यांमध्ये एकूण 50 धावाही करता आल्या नाहीत. हरमनप्रीतने 3 सामन्यांमध्ये एकूण 49 धावा केल्या आहेत. हरमनला पहिल्या 2 सामन्यांमध्ये अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र तिला त्या आकड्याचं मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश आलं. हरमनप्रीतने श्रीलंकेविरुद्ध 21 आणि पाकिस्तान विरद्ध 19 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुहेरी आकडाही गाठता आला नाही. हरमनप्रीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 धावांवर आऊट झाली होती. त्यामुळे हरमनसमोर ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठी खेळी करण्याचं आव्हान असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स या दोन्ही संघात वनडे क्रिकेटच्या इतिहासात एकूण 59 सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलिया भारतावर वरचढ राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा तब्बल 48 सामन्यांमध्ये पराभव केला आहे. तर भारताला फक्त 11 सामन्यांमध्येच कांगारुंना पराभूत करता आलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया भारतासाठी कायमच डोकेदुखी राहिली आहे हे या आकड्यावरुन स्पष्ट होतं.
भारताला वर्ल्ड कप स्पर्धेआधी मायदेशात झालेल्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय साकारला होता.
भारताने वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया विरुद्धचा शेवटचा सामना हा 2017 साली जिंकला होता. भारताने तेव्हा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. हरमनप्रीत कौर हीने त्या सामन्यात 115 बॉलमध्ये 171 रन्स केल्या होत्या. त्यामुळे हरमनप्रीतने पुन्हा एकदा अशी खेळी करावी, अशी आशा चाहत्यांना आहे.