
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 195 धावा केल्या. तसेच विजयासाठी 196 धावांचं आव्हान दिलं. मुंबई इंडियन्सने हे आव्हान 19.2 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयाची शिल्पकार ठरली ती हरमनप्रीत कौर.. तिच्या खेळीमुळे हा विजय सोपा झाला. दरम्यान या स्पर्धेत पहिल्यांदाच एक घडामोड घडली. गुजरात जायंट्सच्या एका खेळाडूला रिटायर्ड आऊट घोषित केलं गेलं. ही खेळाडू दुसरी तिसरी कोणी नसून गुजरात जायंट्सची आयुषी सोनी होती. गुजरातच्या 99 धावा असताना 4 विकेट पडल्या आणि आयुषी मैदानात उतरली. पण तिची फलंदाजी पाहून तिला रिटायर्ड आऊट होण्याची सूचना दिली गेली. तिने 14 चेंडूत 11 धावांची खेळी केली होती. यात एकही चौकार किंवा षटकार मारला नव्हता.
आयुषी सोनी रिटायर्ड आऊट झाल्यानंतर मैदानात भारती फुलमाली आली. तिने 15 चेंडूत 3 चौकार आणि तीन षटकार मारत नाबाद 36 धावा केल्या. तर जॉर्जिया वेयरहमसोबत 56 धावांची भागीदारी केली. त्यामुळे गुजरात जायंट्सला 5 विकेट गमवून 192 धावांपर्यंत मजल मारता आली. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रिटायर्ड आऊट होणारी आयुषी सोनी ही पहिली क्रिकेटपटू ठरली. तर महिला क्रिकेटमध्ये रिटायर्ड आऊट होणारी दुसरी फलंदाज ठरली आहे. यापूर्वी 2024 मध्ये वुमन्स हंड्रेडमध्ये नॉर्दर्न सुपरचार्जर्सविरुद्धच्या सामन्यात मॅन्चेस्टर ओरिजनल्सकडून खेळणारी कॅथरीन ब्राइसला रिटाडर्ट आऊट केलं होतं.
मागच्या 13 दिवसात रिटायर्ड आऊट होण्याचं प्रमाण टी20 क्रिकेटमध्ये वाढलं आहे. पुरूष टी20 क्रिकेटमध्ये 2026 या वर्षात आतापर्यंत सहा रिटायर्ड आऊट झाले आहेत. या न्यूझीलंडच्या सुपर स्मॅशमध्ये एकाच डावात दोन खेळाडू रिटायर्ड आऊट झाले. त्यानंतर बीबीएल 2026 मध्ये मोहम्मद रिझवानला रिटायर्ड आऊट केलं गेलं. त्याच्या धीम्या खेळीमुळे हा निर्णय घेतला गेला. त्यामुळे बराच वाद झाला होता. पण टी20 क्रिकेट हे आता स्लो राहिलं नाही. त्याच्यासाठी आक्रमक खेळणारे फलंदाजच हवे आहेत असं दिसत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात हे प्रमाण वाढलं तर आश्चर्य वाटायला नको.