
वेस्टइंडिज क्रिकेट टीमने दुसर्या आणि करो या मरो एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर मात केली आहे. बांगलादेशने विंडीजला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. विंडीजला विजयासाठी शेवटच्या बॉलवर विजयासाठी 3 धावांची गरज होती. विंडीजने 2 धावा केल्या. दोन्ही संघांच्या समसमान 213 धावा झाल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लागला. विंडीजने सुपर ओव्हरमध्ये बांगलादेशवर मात केली आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली.
ढाक्यातील शेरे बांगला स्टेडियममध्ये दोन्ही संघांना धावांसाठी संघर्ष करावा लागला. विंडीज आणि बांगलादेश दोन्ही संघात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. बांगलादेशला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी होती. तर विंडीजला मालिकेतील आव्हान कायम राखायचं होतं. त्यामुळे 1-1 धावेसाठी आणि विकेटसाठी संघर्ष पाहायला मिळत होता. विंडीजने सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. मात्र बांगलादेशने अखेरच्या क्षणी कमबॅक केलं आणि सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं.
विंडीजने टॉस जिंकला. बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विंडीजने या सामन्यात सर्व 50 ओव्हर फिरकी गोलंदाजांकडून करुन घेतल्या. क्रिकेट विश्वात फिरकी गोलंदाजांनीच संपूर्ण 50 ओव्हर टाकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. विंडीजने बांगलादेशला 50 ओव्हरमध्ये 7 झटके देऊन 213 धावांवर रोखलं.
बांगलादेशसाठी सौम्य सरकार याने 45 धावा केल्या. कॅप्टन मेहदी हसन याने 32 धावा जोडल्या. तर रिशाद हुसैन याने अखेरच्या क्षणी 14 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. त्यामुळे बांगलादेशला 200 पार पोहचता आलं. विंडीजसाठी गुडाकेश मोती याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. अकील हुसैन आणि एलिक अथानजे या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर खारी पियरे आणि रोस्टन चेज या दोघांना विकेट मिळाली नाही. मात्र या दोघांनी चिवट बॉलिंग केली.
विंडीजने विजयी धावांचा पाठलाग करताना 133 धावांवर 7 विकेट्स गमावल्या. मात्र कॅप्टन शाई होप याने एक बाजू लावून धरत विंडीजला सामन्यात कायम ठेवलं. होपने नाबाद 53 धावा केल्या. तर कीसी कार्टी याने 35 धावांचं योगदान दिलं. तर जस्टीन ग्रीव्ह याने 26 धावा जोडल्या. मात्र विंडीजला शेवटच्या ओव्हरमध्ये 5 धावाही करता आल्या नाहीत. बांगलादेशने विंडीजला 4 धावाच करु दिल्या. त्यामुळे दोन्ही संघांच्या धावा समसमान झाल्या.
विंडीजने सुपर ओव्हरमध्ये 10 धावा केल्या. मात्र बांगलादेशला 11 धावा करता आल्या नाहीत. विंडीजने बांगलादेशला 8 धावांवर रोखलं आणि 2 धावांनी सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. विंडीजने अशाप्रकारे मालिकेत बरोबरीत करत पहिल्या पराभवाची परतफेड केली.