
Bangladesh Premier League 2025/26: बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. खेळाडूंनी या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. ही स्पर्धा होणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने एक पाऊल पुढे टाकतं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली. बांगलादेशी खेळाडूंच्या विरोधामुळे आणि बहिष्कारास्त्रामुळे लीग स्पर्धा होईल की नाही याबाबत शंका होती. 15 जानेवारी 2026 रोजी चटगांव रॉयल्स आणि नोआखाली एक्स्प्रेस यांच्यात सामना होणार होता. पण दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात उतरलेच नाही. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे फायनान्स कमिटी चेअरमन नजमुल इस्लाम यांच्या वादग्रस्त विधानानंतर वादाची ठिगणी पडली होती. त्यांच्या विधानामुळे खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नजमुल इस्लाम यांनी केलेल्या विधानाचा त्यांनी निषेध केला.
नजमुल यांनी सांगितलं होतं की, बागंलादेशचा संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात गेला नाही तरी बोर्डाला काहीच फरक पडणार नाही. फार तर खेळाडूंचं आर्थिक नुकसान होईल. त्यांना मॅच फी मिळणार नाही. इतकंच काय तर खेळाडूंना भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांना भरपाई का द्यावी. जर ते कुठे जाऊन काहीच करणार नाहीत, तर त्यांच्या पाठी खर्च केलेले कोट्यवधि रुपये ते परत करतील का? आम्ही ते मागणार का? बोर्डाशिवाय खेळाडूंना जगणे कठीण होईल.
बांग्लादेश क्रिकेटर असोसिएशन ऑफ बांगलादेशने नजमुल इस्लाम यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेपूर्वी नजमुल इस्लाम यांनी पदाचा राजीनामा दिला नाही तर क्रिकेट खेळणार नाही, असा पवित्रा खेळाडूंनी घेतला होता. त्याचाच भाग म्हणून 15 जानेवारीला होणाऱ्या सामन्यासाठी खेळाडू मैदानात गेलेच नाहीत. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. बीसीबीने नजमुल इस्लाम यांना सर्व जबाबदाऱ्यांमधून मोकळं केलं आहे. दुसरीकडे, CWAB अध्यक्ष मोहम्मद मिथुन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, खेळाडू लेखी हमीशिवाय मैदानात उतरणार नाहीत.