
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना बांगलादेशची आडमुठी भूमिका कायम आहे. भारतात खेळण्यास बांगलादेशने स्पष्ट नकार दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पेच काही सुटलेला नाही. त्यात आयसीसीचं शिष्टमंडळ बांगलादेशला गेलं होतं. पण या बैठकीतही काही तोडगा निघू शकलेला नाही. यावेळी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने वेगळीच मागणी आयसीसीपुढे ठेवली. त्यामुळे हा पेच आणखी वाढणार असं दिसत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशने ग्रुप बदलण्याची मागणी केली आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने सांगितलं की, गट क मधून गट ब मध्ये सहभागी करा. कारण या गटातील सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहे. त्यामुळे प्रवास आणि सुरक्षेचा प्रश्न येणार नाही. आयर्लंडसोबत बदली करण्याची सूचना बांगलादेशने दिली आहे.
बीसीबीने स्पष्ट सांगितलं की, बांगलादेशने सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करण्याची मागणी केली आहे. बांग्लादेश सरकारकडून संघ, बांगलादेशी चाहते, मिडिया आणि इतरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. टी20 वर्ल्डकप वेळापत्रकानुसार, आयर्लंडचा संघ सध्या ब गटात आहे. त्यांना साखळी फेरीत श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, आणि ओमान विरूद्ध सर्व सामने कोलंबोत खेळायचे आहेत. तर शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध कँडीमध्ये होणार आहे. दुसरीकडे बांगलादेशच्या गटात वेस्ट इंडिज, इटली, नेपाळ आणि इंग्लंड हे संघ आहेत. यापैकी वेस्ट इंडिज, इटली आणि इंग्लंड विरुद्धचे सामने कोलकात्यात होणार आहे. नेपाळविरुद्धचा सामना मुंबईत आयोजित केला आहे.
बांगलादेशात होणाऱ्या हिंसाचारानंतर बीसीसीआयने मुस्तफिझुर रहमानला आयपीएलमधून काढलं. त्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा संताप झाला आहे. 3 जानेवारीला हा प्रकार घडल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इतकंच काय तर बांगलादेशात आयपीएल प्रसारणावरही रोख लावली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकात्यात होणार आहे. दुसरा सामना 9 फेब्रुवारीला इटलीविरुद्ध कोलकात्यात, 14 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध कोलकात्यात आणि 17 फेब्रुवारी नेपाळविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.