
श्रेयस अय्यरची टीम इंडियात उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली आणि त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर श्रेयस अय्यरला टीम इंडियात जागा मिळाली होती. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर फलंदाज एलेक्स कॅरीचा झेल पकडताना बरगडीला गंभीर दुखापत झाली आहे. हार्षित राणाच्या गोलंदाजीवर श्रेयसने अप्रतिम झेल घेतला. पण मैदानात उठला तेव्हा पोट आणि छातीला घट्ट धरून वेदनेने ओरडताना दिसला. त्यामुळे त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सिडनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आता त्याला आयसीयूत दाखल करण्याची वेळ आली आहे. तपासणीत त्याची प्लीहा (Spleen) फुटल्याने रक्तस्त्राव होत असल्याचं निष्पन्न झालं आहे. भारतीय डॉक्टरांचं पथकही त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
बीसीसीआयने श्रेयस अय्यरच्या प्रकृती माहिती देताना सांगितलं की, “25 ऑक्टोबर 2025 रोजी सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरला डाव्या बरगडीला दुखापत झाली होती. त्याला तपासणीसाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. स्कॅनमध्ये प्लीहा फुटल्याचे दिसून आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तो वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहे आणि तो बरा होत आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम सिडनी आणि भारतातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून त्याच्या दुखापतीचे बारकाईने निरीक्षण करत आहे. भारतीय संघाचे डॉक्टर श्रेयसच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी सिडनीमध्ये त्याच्यासोबत असतील.”
Medical update on Shreyas Iyer. Details 🔽 #TeamIndia | #AUSvIND https://t.co/8LTbv7G1xy
— BCCI (@BCCI) October 27, 2025
प्लीहा हा पोटाच्या वर आणि बरगड्यांच्या खाली स्थित एक मऊ, स्पंजसारखा अवयव आहे. हे रक्तासाठी फिल्टर म्हणून काम करते. तसेच जुन्या किंवा खराब झालेल्या लाल रक्तपेशी काढून टाकण्यास मदत करते. प्लीहा हा रोगप्रतिकार प्रणालीचा एक भाग आहे. प्लीहा संसर्गाशी लढण्यास मदत करण्यासाठी लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी देखील साठवते. त्यामुळे श्रेयस अय्यरला याच ठिकाणी दुखापत झाल्याने भारतीय क्रीडाप्रेमींची चिंता वाढली आहे.
श्रेयस अय्यला झालेली दुखापत गंभीर असल्याने त्याला बरं होण्यासाठी काही महिने लागू शकतात. इतकंच काय तर त्या पुढचे 5 ते 7 दिवस सिडनीतील रुग्णालयात राहावं लागणार आहे. मायदेशी परतल्यानंतर त्याला सक्तीचा आराम करावा लागेल. त्यानंतर फिटनेस मिळवला तर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन होऊ शकते. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याची निवड झालेली नाही. पण पुढच्या महिन्यात दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला दुखापतीमुळे मुकण्याची शक्यता आहे.