टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियात उलथापालथ? बीसीसीआयच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

मुंबईत बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीला माजी क्रिकेटपटू आणि सीओईचे क्रिकेटचे हेड व्हीव्हीएस लक्ष्मणने हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर काही घडामोडी घडण्याचा अंदाज क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियात उलथापालथ? बीसीसीआयच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियात उलथापालथ? बीसीसीआयच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
Image Credit source: X
| Updated on: Jan 09, 2026 | 10:52 PM

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होत आहे. त्यामुळे टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. पण आतापर्यंतच्या इतिहासात कधीच एका संघाने सलग जेतेपद मिळवलेलं नाही. त्यामुळे भारतीय संघापुढे मोठं आव्हान असणार आहे. खरं तर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी हा कठीण पेपर असणार आहे. असं असताना शुक्रवारी मुंबईत बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया , अध्यक्ष मिथुन मन्हास , उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सीओई क्रिकेट प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे देखील उपस्थित होते. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. क्रीडाप्रेमी त्यांच्या त्यांच्या परीने अर्थ काढत आहेत. दुसरीकडे, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी पीटीआयला सांगितले की, बैठकीत सीओईच्या कामकाज, तयारी आणि भविष्यातील योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितलं की, ‘आम्ही सीओईमधील रिक्त पदांवर चर्चा केली आणि लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, परंतु आम्ही शक्य तितक्या लवकर ही पदे भरू, सीओईच्या तयारी आणि कामकाजाचा आढावा घेण्याची ही योग्य वेळ होती . विजय हजारे ट्रॉफीसह तीन मैदानांवर सामने खेळवले जात आहेत . भविष्यात A संघ दौरे कसे आयोजित करावेत यावरही आम्ही चर्चा केली . कधीकधी A संघ आणि वरिष्ठ संघ एकत्र दौरे करतात. असे होणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. भविष्यातील क्रिकेटपटूंसाठी A संघ दौरे महत्त्वाचे आहेत.’

दुसरीकडे, गौतम गंभीरच्या कार्यकाळात टीम इंडियाची कामगिरी संमिश्र राहिली आहे. खासकरून कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाने सुमार कामगिरी केली आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेविरूद्ध व्हाईट वॉश मिळाल्याने टीकेचा धनी ठरला आहे. त्यामुळे गौतम गंभीरसाठी टी20 वर्ल्डकप स्पर्धा ही अग्निपरीक्षा असणार आहे, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. या स्पर्धेतील कामगिरीवर त्याचं भवितव्य ठरेल असा अंदाही क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.