टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, टी20 विश्वचषकापूर्वी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांचा फ्लॉप शो
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण कर्णधार सूर्यकुमार यादवचा फ्लॉप शो सुरूच आहे. शिवम दुबेच्या खेळीनेही टीम इंडियाच्या चाहत्यांची धाकधूक वाढवली आहे.

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंची चाचणी सुरु आहे. पण या चाचणी परीक्षेत टीम इंडियाच्या टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पूर्णपणे फेल गेला आहे. मागच्या वर्षापासून सूर्यकुमार यादव फॉर्मच्या शोधात आहे. पण त्याला सूर काही गवसताना दिसत नाही. त्याच्याकडे संघाचं कर्णधारपद आहे म्हणून नाही तर त्याची संघातून कधीच गच्छंती झाली असती असं क्रीडाप्रेमी म्हणत आहे. विजय हजारे ट्रॉफीत सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे मुंबई संघाकडून खेळत आहेत. पण दोघेही या स्पर्धेत फेल गेले. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी त्यांच्या फॉर्मची चिंता क्रीडाप्रेमींना भासू लागली आहे. सुमार कामगिरी सुरु राहिली तर टी20 वर्ल्डकप जिंकणं कठीण असल्याचं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. विजय हजारे ट्रॉफीतील मुंबई विरुद्ध पंजाब हा सामना 8 जानेवारीला खेळला गेला. हा सामना मुंबईने फक्त एका धावेने गमावला. खरं तर संघात सूर्यकुमार, शिवम दुबे असताना असा पराभव पचनी पडत नाही.
पंजाबने 45.1 षटकात सर्व गडी गमवून 216 धावा केल्या होत्या. तसेच मुंबईपुढे विजयासाठी 217 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना 25 धावा असताना मुशीर खानच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर 90 झाल्यानंतर अंगकृश रघुवंशी बाद झाला. सरफराज खान आणि अंगकृशने त्यातल्या डाव सावरला होता. या दोघांच्या खेळीमुळे 3 बाद 139 धावा झाल्या होत्या. त्यामुळे मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्याकडून अपेक्षा होत्या. पण या दोघांनी अपेक्षाभंग केला. सूर्यकुमार 12 चेंडूत 15 धावा, तर शिवम दुबे 6 चेंडूत 12 धावा करून बाद झाले.
टीम इंडियाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवचा फ्लॉप शो 2024पासून सुरुच आहे. त्याने 2024 मध्ये शेवटचं अर्धशतक झळकावलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत चांगल्या कामगिरीसाठी झुंजत आहे. 2025 वर्षात तर त्याने काहीच केलं नाही. विजय हजारे ट्रॉफीत हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात फक्त 24 धावा केल्या. दक्षिण अएफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या तीन टी20 सामन्यात 5, 12, 5 धावा केल्या. तर शिवम दुबेने हिमाचलविरुद्ध 20 धावा केल्या होत्या.
