Team India : Bcci कडून द्रविडसह 3 दिग्गजांचा होणार मोठा सन्मान, कार्यक्रम कधी-कुठे?

BCCI Lifetime Achievement Award: भारतीय क्रिकेटमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या 3 माजी दिग्गजांना त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. या तिघांमध्ये राहुल द्रविड यांच्यासह कुणाचा समावेश आहे? जाणून घ्या.

Team India : Bcci कडून द्रविडसह 3 दिग्गजांचा होणार मोठा सन्मान, कार्यक्रम कधी-कुठे?
Bcci Lifetime Achievement Award
Image Credit source: X/GETTY
| Updated on: Mar 14, 2026 | 6:41 PM

टीम इंडियाने गेल्या काही वर्षांत सातत्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेंटमध्ये अपवाद वगळता जबरदस्त कामगिरी केली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यानंतर आता सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल याच्या हे यशस्वीपणे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहेत. भारताने शुबमनच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्धची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. तर सूर्याच्या नेतृत्वात भारताने द्विपक्षीय मालिका, आशिया कप आणि टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी करुन दाखवली आहे. भारतासाठी 2024-2025 या मोसमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा बीसीसीआयकडून सन्मान करण्यात येणार आहे.

बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार रविवारी 15 मार्च रोजी नवी दिल्लीत बीसीसीआयकडून नमन पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या पुरस्कार सोहळ्यात टीम इंडियासाठी 2024-2025 या हंगामात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित केलं जाणार आहे. सोबतच भारताच्या 3 माजी दिग्गज खेळाडूंचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. बीसीसीआयकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा सन्मान असणार आहे.

बीसीसीआयकडून 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे खेळाडू रॉजर बिन्नी, टीम इंडियाच्या 2024 टी 20i वर्ल्ड कप विजेत्या संघाचे प्रशिक्षक आणि दिग्गज माजी फलंदाज राहुल द्रविड आणि माजी महिला कर्णधार मिताली राज या तिघांना बीसीसीआयकडून जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित केलं जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असं या पुरस्कारचं स्वरुप असणार आहे. या 3 दिग्गजांना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्यात येणार असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या तिन्ही दिग्गजांच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाबाबत जाणून घेऊयात.

रॉजर बिन्नी

रॉजर बिन्नी 1983 सालच्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील सदस्य होते. बिन्नी यांनी त्या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स मिळवल्या होत्या. बिन्नी यांनी निवृत्तीनंतर कोचिंग आणि प्रशासनातही योगदान दिलं. बिन्नी यांच्या कोचिंगमध्ये भारताने 2000 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला. बिन्नी 2012-2016 दरम्यान निवड समितीचे भाग होते. तसेच बिन्नी यांनी 2022 ते 2025 दरम्यान बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली.

राहुल द्रविड

द्रविड यांनी क्रिकेटपटू म्हणून भारताचं दशकापेक्षा अधिक काळ प्रतिनिधित्व केलं. तसेच या दरम्यान काही वर्ष नेतृत्वाचीही जबाबदारी पार पाडली. द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या. द्रविड यांनी निवृत्तीनंतर एनसीए प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. द्रविड यांच्याच कोचिंगमध्ये भारताने 2018 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला. तर 2024 साली द्रविड यांच्या मार्गदर्शनात भारताने रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत टी 20i वर्ल्ड कप उंचावला होता.

मिताली ‘राज’

दिग्गज माजी कर्णधार मिताली राज हीने 20 वर्षांपेक्षा अधिक काळ क्रिकेटची सेवा केली. मितालीने टीम इंडियासाठी खेळताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 7 हजार 805 धावा केल्या. मितालीने तिच्या नेतृत्वात भारताला अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं. मात्र भारताला तेव्हा उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं. मितालीने महिला क्रिकेटला नवी ओळख मिळवून दिली. तसेच अनेक युवा खेळाडूंना क्रिकेटसाठी प्रोत्साहित केलं.

Follow Us