
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका अलिकडेच संपली. तीन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी जिंकली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा उपकर्णधार श्रेयस अय्यर क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला आहे. अॅलेक्स कॅरीचा कॅच घेताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याच्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना शनिवारी खेळवण्यात आला. या सामन्यात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर अॅलेक्स कॅरीचा कॅच घेताना श्रेयस अय्यरच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली आहे. यामुळे आता तो तब्बल 3 आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “श्रेयसला सामन्यादरम्यान स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याच्या बरगडीचे फ्रॅक्चर झाले असून आता त्याला किमान तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागेल. यानंतर तो सेंटर ऑफ एक्सलन्सला रिपोर्ट करेल. त्यानंतर पुढील चाचण्या केल्या जातील. यानंतर त्याला आणखी विश्रांती घ्यावी लागू शकतो.
श्रेयस अय्यर मैदानावर कधी परतणार असा सवाल आता क्रिकेटप्रेमींना पडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अय्यर 30 नोव्हेंबर रोजी रांची येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले की, ‘अय्यर मैदानावर कधी परतणार हे सांगणे कठीण आहे. त्याला दुखापतीतून सावरण्यास जर 4 आठवडे लागले तर त्याला मैदानात उतरणे कठीण होऊ शकते.’
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात अॅलेक्स कॅरीने खेळलेला एक शॉट थर्ड मॅनकडे गेला. त्यावेळी अय्यर बॅकवर्ड पॉइंटवर उभा होता. तो चेंडूच्या दिशेने गेला आणि शानदार कॅच घेतला, मात्र तो जमिनीवर पडला, यात त्याच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली. यानंतर संघाचे फिजिओ कमलेश जैन ताबडतोब मैदानावर आले आणि त्यांनी अय्यरला मैदानाबाहेर नेले. त्यानंतर त्याला रूग्णालयात नेण्यात आले. आता तो मैदानावर कधी परतणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.