
टीम इंडियाचा प्रमुख ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिका आणि संपूर्ण टी 20i सीरिजमधून बाहेर व्हावं लागलंय. सुंदरला बडोद्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान बॉलिंग करताना दुखापत झाली. त्यामुळे सुंदरला न्यूझीलंड विरूद्धच्या उर्वरित दोन्ही मालिकेतील सामन्यांना मुकावं लागलं आहे. तसेच अवघ्या काही दिवसांवर आयसीसी टी वर्ल्ड कप 2026 स्पर्धा येऊन ठेपली आहे. त्यामुळे सुंदरच्या दुखापतीकडे टीम मॅनेजमेंटचं बारीक लक्ष लागून आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तसेच भारतात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. सुंदर भारताचं प्रमुख अस्त्र आहे. त्यामुळे सुंदरचं फिट होणं भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे. सुंदर फिट न झाल्यास त्याला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. त्यामुळे सुंदरवर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. सुंदर या दुखापतीतून फिट झाला नाही तर त्याला वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. त्यामुळे सुंदरचं वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न भंग होऊ शकतं. आतापर्यंत भारताच्या काही खेळाडूंना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावं लागलंय. त्या खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.
भारताचा माजी विस्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला दुखापतीमुळे तब्बल 2 टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. सेहवागला खांद्याच्या दुखापतीमुळे 2009 आणि 2010 मधील टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळता आलं नव्हतं. त्यामुळे वीरुच्या जागी मुरली विजय याचा समावेश करण्यात आला होता.
भारताचा गोलंदाज प्रवीण कुमार याला 2011 च्या भारतात झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलेलं. त्यामुळे प्रवीणच्या जागी एस श्रीसंथ याचा समावेश करण्यात आलेला.
वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याची 2015 च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. मात्र इशांतला गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं. इशांतच्या जागी मोहित शर्मा याचा समावेश करण्यात आला होता.
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याला 2022 साली झालेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पाठीच्या दुखापतीमुळे खेळता आलं नव्हतं. बुमराहच्या जागी मोहम्मद शमी याचा समावेश करण्यात आला होता.
ऑलराउंडर अक्षर पटेल हा भारताचा दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर होणारा अखेरचा खेळाडू आहे. अक्षरची 2023 च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत निवड झाली होती. मात्र अक्षरला दुखापत झाली. त्यामुळे अक्षरच्या जागी अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याला संधी मिळाली.