गिलच्या शतकी खेळीने बांगलादेशविरुद्धचा सामना सहज जिंकला, शुबमन सामन्यानंतर म्हणाला…
भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना 6 विकेट राखून जिंकला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकात सर्व गडी गमवून 228 धावा केल्या आणि विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 4 गडी गमवून 46.3 षटकात पूर्ण केलं.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली. पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला. नाणेफेकीचा कौल जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने 49.4 षटकात सर्व गडी गमवून 228 धावा केल्या आणि विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान वाटतं तितकं सोपं नव्हतं. या सामन्यात भारताच्या विजयात शुबमन गिलचा मोलाचा वाटा होता. त्याने 129 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावा केल्या. त्याला विकेटकीपर केएल राहुलची उत्तम साथ लाभली. या विजयामुळे टीम इंडियाचा उपांत्य फेरीचा मार्ग सोपा झाला आहे. आता उर्वरित दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला की झालं. त्यात पाकिस्तानला हरवलं की थेट उपांत्य फेरीत स्थान मिळणार आहे. या सामन्यानंतर शुबमन गिलने आपल्या भावना व्यक्त केल्या.
शतकी खेळीनंतर शुबमन गिल म्हणाला की, ‘मी खेळलेल्या माझ्या सर्वात समाधानकारक डावांपैकी एक आणि आयसीसी स्पर्धांमधील माझे पहिले शतक. मी ज्या पद्धतीने कामगिरी केली त्याबद्दल खूप समाधानी आणि खूप आनंदी. जेव्हा मी आणि रोहित शर्मा मैदानावर गेलो तेव्हा आम्हाला वाटले की चेंडू खेळणे सोपे नाही कारण ऑफ-स्टंपच्या बाहेर असलेले चेंडू बॅटवर चांगले येत नव्हते. म्हणून मी माझ्या पायांचा वापर वेगवान गोलंदाजांना बरोबरी करण्यासाठी करण्याचा विचार केला आणि सर्कलच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न केला.”
‘जेव्हा फिरकीपटू आले तेव्हा मी आणि विराट भाई बोलत होतो की फ्रंट फूटवरून एकेरी धावा काढणे सोपे नाही, म्हणून आपण बॅकफूटवरून एकेरी धाव काढण्याचा प्रयत्न करू. तसेच आपण फक्त स्ट्राईक फिरवत राहतो. एका क्षणी, आमच्यावर थोडा दबाव होता. बाहेरून संदेश आला की मला शेवटपर्यंत फलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि मी तेच करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या षटकाराने मला खूप आत्मविश्वास दिला आणि दुसऱ्याने षटकाराने मला माझ्या शतकाच्या जवळ येण्यास मदत केली, त्यामुळे दोन्ही खूप समाधानकारक होते.’, असंही शुबमन गिल म्हणाला.
