IPL 2026 स्पर्धेत 3 सामने गमावल्यानंतरही चेन्नई प्लेऑफमध्ये जागा मिळवणार, 3 बदल घडवणार चमत्कार!
चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल 2026 स्पर्धेतील सुरूवात निराशाजनक झाली आहे. पाच वेळा जेतेपद मिळवणाऱ्या संघाची अशी स्थिती पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान, पंजाब आणि आरसीबीविरूद्ध सामने गमावले आहेत.

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. पहिल्या तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा पराभूत केलं. त्यानंतर पंजाब किंग्सने होमग्राउंड असलेल्या चेपॉकवर पराभवाची धूळ चारली. आरसीबीने तर दारूण पराभव केला. त्यामुळे चेन्नईचा प्लेऑफचा प्रवास प्रत्येक पराभवानंतर आणखी कठीण होत जाणार आहे. त्यामुळे साखळी उर्वरित 11 सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पण पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलेला चेन्नई सुपर किंग्स संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवणार का? चेन्नई सुपर किंग्स पराभवाची मालिका मोडणार का? असे एक ना अनेक प्रश्न समोर येत आहे. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्सला तीन बदलांची गरज आहे. जर हे बदल केले तर चेन्नई सुपर किंग्सची गाडी विजयाच्या रुळावर धावेल असं जाणकार सांगत आहेत.
गोलंदाजीची कमकुवत बाजू
चेन्नई सुपर किंग्सला आपल्या गोलंदाजीत बदल करणं गरजेचं आहे. कारण पावरप्ले आणि डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजांनी सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. आतापर्यंत झालेल्या तिन्ही पराभवात ही बाजू ठळकपणे अधोरेखित झाली आहे. असं असताना चेन्नई सुपर किंग्सने अकील होसैनला संधी देणं गरजेचं आहे. त्याला तिन्ही सामन्यात संधी मिळालेली नाही. अकीलकडे टी20 क्रिकेटमध्ये 273 सामन्यांचा अनुभव आहे आणि 254 विकेट घेतल्या आहेत. होसैन पावरप्लेमध्ये गोलंदाजी करतो आणि त्याचा इकोनॉमी रेट हा 7.1 आहे.
मधल्या फळीत बदलाची गरज
चेन्नई सुपर किंग्सला मधल्या फळीत बदल करणं आवश्यक आहे. या फळीत दोन नवखे खेळाडू असून पहिल्यांदा आयपीएल खेळत आहेत. कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर यांना चेन्नईने 14.2 कोटींना विकत घेतलं आहे. पण त्यांना संधी देताना मधल्या फळीत डेवाल्ड ब्रेव्हिसचा विचार करणं गरजेचं आहे. डेवाल्ड ब्रेविस दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात फिट होईल असं बोललं जात आहे. प्लेइंग 11 मध्ये आल्यास संघाची बाजू भक्कम होईल.
धोनीचं पुनरागमन गरजेचं
महेंद्रसिंह धोनी दुखापतीमुळे सुरूवातीच्या सामन्यांना मुकला आहे. पण त्याच्या गैरहजेरीत अनुभवाची उणीव भासत आहे. तीन पराभवानंतर ही बाब स्पष्टपणे उघड झाली आहे. कारण चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची निर्णय क्षमतेत काही उणीवा दिसत आहेत. धोनी विकेटमागून गोलंदाजांना मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे गोलंदाजांना खूपच मदत होते.