मानव सुथारच्या फिरकीची जादू इंग्लंडमध्ये चालली, 7 विकेट काढून संघाला मिळवून दिला विजय
County Championship: काउंटी क्रिकेट स्पर्धेत भारतीय फिरकीपटू मानव सुथारच्या फिरकीने कमाल केली. वॉरिकशरकडून खेळताना त्याने प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवून दिली. त्याच्या या कामगिरीमुळे संघाला विजय मिळाला.

Manav Suthar In County Championship: इंग्लंडच्या साउथँप्टनमध्ये खेळलेल्या काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 1 सामन्यात वॉरिकशर आणि हॅम्पशर यांच्यात लढत झाली. या सामन्यात हॅम्पशरने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय वॉरिकशरने फलंदाजांनी फोल ठरवला. सलामी फलंदाज रॉब येट्सने 208 चेंडूंचा समना करत 13 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 109 धावा केल्या. मधल्या फळीत सॅम हेनने 90 धावा, डॅन मौसलीने 77 आणि काय स्मिथने 51 धावा केल्या. यामुळे पहिल्या डावात वॉरिकशरने 398 धावांचा मोठा डोंगर रचला. त्यामुळे इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना हॅम्पशरचा संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. पहिल्या डावात मानव सुथारने आपल्या फिरकीच्या जाळ्यात हॅम्पशरच्या फलंदाजांना गोवलं. त्याने 16 षटकात फक्त 42 धावा दिल्या आणि 3 विकेट काढल्या. इतकंच काय तर वेगवान गोलंदाज इथान बांबर आणि ओलिवर हाननने प्रत्येकी 3-3 विकेट काढल्या. हॅम्पशरने पहिल्या डावात 115 धावांवर सर्वबाद झाले.
पहिल्या डावात वॉरिकशरने 283 धावांची मोठी आघाडी घेतली. त्यामुळे फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. हा फॉलोऑन पार करताना पुन्हा एकदा हॅम्पशरचा संघ पुन्हा एकदा 154 धावांवर गारद झाला. या सामन्यात वॉरिकशरने एक डाव आणि 129 धावांनी विजय मिळवला. या डावातही मानव सुथारच्या गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला. मानव सुथारने 23.3 षटकात 52 धावा देत 4 विकेट काढल्या. त्यामुळे मानव सुथारच्या नावावर एकूण 7 विकेट झाल्या. खरं तर या विजयात त्याचा मोलाचा वाटा राहिला.
दोन्ही संघाचे खेळाडू
वॉरिकशरचा संघ : रॉबर्ट येट्स, विल यंग, डॅन माउस्ले, सॅम हेन, वंश जानी, एड बर्नार्ड (कर्णधार), काय स्मिथ (यष्टीरक्षक), मानव सुथार, ख्रिस वोक्स, इथन बाम्बर, ऑलिव्हर हॅनन-डाल्बी.
हॅम्पशरचा संघ : अलिस्टर ऑर, निक गुबिन्स, टोबी अल्बर्ट, जेक लेहमन, बेन मेस, बेन ब्राउन (कर्णधार)(यष्टीरक्षक), जेम्स फुलर, अँड्र्यू जॉन नील, स्कॉट करी, काइल अॅबॉट, एडी जॅक.
