शिखर धवन दिसणार नव्या भूमिकेत, 50 सेकंदाच्या व्हिडीओत मोठा खुलासा
शिखर धवन भारतीय क्रिकेट संघातून आता बाहेरच असणार आहे. त्यात आयपीएल 2024 स्पर्धेत सुरुवातीचे काही सामने खेळल्यानंतर धवन बेंचवरच बसलेला दिसला. असं असताना पुढच्या वाढचालीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यास शिखर धवन लवकरच क्रिकेटला रामराम ठोकणार असं दिसत आहे.

भारतीय क्रिकेटमधील शिखर धवन एक मोठं नाव आहे. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम रचले आहेत. काही विक्रम मोडले देखील आहेत. मात्र सध्याची स्थिती पाहता शिखर धवनला भारतीय संघात स्थान मिळणं कठीण आहे. दुसरीकडे, शिखर धवन आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळत आहे. मात्र येथेही त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. सुरुवातीचे काही सामने खेळला खरा, मात्र त्यानंतर झालेल्या दुखापतीने बेंचवरच बसून राहिला. पंजाब किंग्सचं स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आलं आहे. असं असताना शिखर धवन आयपीएल संपल्यानंतर काय करणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. शिखर धवन लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. शिखर धवनचा एक कार्यक्रम येणार आहे. यात कॉमेडीसह अनेक सेलिब्रिटींशी गपशप करताना दिसणार आहे. त्याचा या कार्यक्रमाचा 50 सेकंदाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अक्षय कुमार,ऋषभ पंत, हरभजन सिंग या सारखे स्टार हजेरी लावताना दिसत आहे. या कार्यक्रमाला ‘धवन करेंगे’ असं नाव देण्यात आलं आहे. हा शो 20 मेपासून जिओ सिनेमा अॅपवर दिसेल.
कार्यक्रमाच्या टीझरनंतर शिखर धवन क्रिकेटला रामराम ठोकेल असं सांगण्यात येत आहे. शिखर धवन आता 38 वर्षांचा आहे. तसेच टीम इंडियातून दोन वर्षापासून लांब आहे. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय सामना तीन वर्षांपूर्वी खेळला होता. आता आयपीएलमध्येही त्याचं करिअर वाटतं तितकं राहिलेलं नाही. या पर्वात शिखर धवनकडे पंजाब किंग्सची धुरा होती. मात्र जखमी असल्याने पाच सामन्यात खेळू शकला. त्याच्या ऐवजी संघाची धुरा सॅम करनच्या खांद्यावर आहे. असं असताना धवन आता मनोरंजन क्षेत्रात नशिब आजमावणार असल्याचं दिसत आहे. या टॉक शोमुळे शिखर धवनच्या क्रिकेट कारकिर्दिचा शेवट जवळ आल्याचं दिसत आहे.
View this post on Instagram
शिखर धवनने आपल्या सोशल मीडियावरून अनेकदा आपल्यातील कौशल्य दाखवलं आहे. बासरी वाजवण्यापासून कॉमेडी रील्स बनवून पोस्ट केले आहेत. त्याच्या या व्हिडीओवर लाखो व्ह्यूज आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. त्यामुळे या शोमध्ये शिखर धवन नक्कीच चांगलं करून दाखवेल असं त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. या शोमध्ये बॉलिवूड स्टार, क्रिकेटपटू यांची हजेरी असणार आहे. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.