डेविड मिलरचं 5.5 कोटींचं नुकसान, आता 38 चेंडूतच सामना फिरवला

दक्षिण अफ्रिकेत SA20 लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सनरायझर्स ईस्टर्न केप विरुद्ध पार्ल रॉयल्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात विजयाचा हिरो कर्णधार डेविड मिलर ठरला. त्याच्या खेळीमुळे पार्ल रॉयल्स दोन चेंडू राखून विजय मिळवला.

डेविड मिलरचं 5.5 कोटींचं नुकसान, आता 38 चेंडूतच सामना फिरवला
डेविड मिलरचं 5.5 कोटींचं नुकसान, आता 38 चेंडूतच सामना फिरवला
Image Credit source: SA20 ट्विटर
| Updated on: Dec 31, 2025 | 10:19 PM

दक्षिण अफ्रिकेचा मधल्या फळीतील डेविड मिलर सामन्याचं चित्र बदलण्याची ताकद ठेवतो. आतापर्यंत त्याने अनेक सामन्यांचं चित्र एकहाती बदललं आहे. त्यामुळे डेविड मिलर खेळपट्टीवर असला की प्रतिस्पर्धी संघाना धाकधूक असते. असंच काहीसं चित्र दक्षिण अफ्रिकेच्या टी20 लीगच्या सातव्या सामन्यात डेविड मिलरने अशीच खेळी केली. गॅबरखामध्ये सनरायझर्स ईस्टर्न केप विरुद्ध पार्ल रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात सनरायझर्स ईस्टर्न केपने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 149 धावा केल्या. तसेच विजयासाठी 150 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान पार्ल रॉयल्सने 2 चेंडू राखून पूर्ण केलं. हा सामना पार्ल रॉयल्सने 5 गडी राखून जिंकला खरा पण एक वेळ हा सामना पूर्णपणे सनरायझर्स ईस्टर्न केपच्या बाजूने झुकलेला होता. पण डेविड मिलरने विजयाचा घास घशातून खेचून आणला.

सनरायझर्स ईस्टर्न केपने विजयासाठी दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना पार्ल रॉयल्सची सुरूवात निराशाजनक राहिली. 42 चेंडूत फक्त 35 धावा केल्या आणि 4 विकेटही गमावल्या होत्या. त्यामुळे पार्ल रॉयल्सची स्थिती नाजूक होती. तेव्हा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला कर्णधार डेविड मिलर आला. त्याने या सामन्याचं चित्र पालटलं. त्याने 28 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकार मारत अर्धशतक झळकावलं. इतक्यावर तो काही थांबला नाही. त्याने पुढे 38 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. कीगन लायनसोबत त्याने पाचव्या विकेटसाठी 68 चेंडूत 100 धावांची भागीदारी केली. किगन 45 दावा करून बाद झाला. पण डेविड मिलरने हा सामना जिंकवून दिला. यासह पार्ल रॉयल्सचं स्पर्धेतील विजयाचं खातं खुललं. आतापर्यंत दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे.

डेविड मिलर आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. पण या त्याचं 5.5 कोटींचं नुकसान झालं आहे. कारण लखनौ सुपर जायंटस्ने मागच्या पर्वात त्याच्यासाठी 7.5 कोटी मोजले होते. पण यावेळी त्यांनी त्याला रिलीज केलं आणि 2 कोटींच्या बेस प्राईससह लिलावात आला. त्याच्या कोणीही बोली लावली नाही. त्यामुळे मिलर अवघ्या दोन कोटीत दिल्ली कॅपिटल्सला मिळला. त्यामुळे त्याचं मागच्या पर्वाच्या तुलनेत 5.5 कोटींचं नुकसान झालं. पण त्याच्या एसए20 मधील खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सच्या आनंदाला मात्र पारावर उरला नसेल हे देखील तितकंच खरं आहे.