
आयपीएल 2025 स्पर्धेतील 26वा सामना गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून लखनौ सुपर जायंट्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण गुजरात टायटन्सने आश्वासक सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी फोडण्यात आवेश खानला यश आलं. शुबमन गिली 38 चेंडूत 60 धावा करून बाद झाला. त्याच्या मागोमाग साई सुदर्शनही 56 धावांची खेळी करून तंबूत परतला. मधल्या फळीवर संघाची भिस्त होती. जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी मैदानात होती. रवि बिष्णोईने वॉशिंग्टन सुंदरची विकेट काढली. तर जोस बटलरची विकेट काढण्यात द्विग्वेश राठीला यश आलं. 17 व्या षटकात दिग्वेश राठीने जोस बटलरला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 14 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या आणि बाद झाला. दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर शार्दुल ठाकुरने त्याचा अप्रतिम झेल पकडला.
जोस बटरलचा झेल पकडल्यानंतर दिग्वेशने सेलिब्रेशनचा पेन बाहेर काढला. तसेच खेळपट्टीवर या विकेटची नोंद केली. दिग्वेश राठीने या सामन्यात 4 षटकात 30 धावा देत एक गडी बाद केला. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यातही राठीने सुनील नरीनला बाद केल्यानंतर असंच सेलीब्रेशन केलं होतं. पण यावेळी खेळाडूंच्या जवळ जाण्याचं धाडस केलं नाही. यापूर्वी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात जवळ जाऊन सेलीब्रेशन केलं होतं. पंजाब किंग्सचा फलंदाज प्रियांश आर्यच्या जवळ जाऊन त्याने सेलीब्रेशन केलं होतं. यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला होता. राठीच्या खात्यात सध्या तीन डिमेरीट गुण आहेत. आता राठीला आणखी एक डिमेरीट गुण मिळाला तर एका सामन्याची बंदी घातली जाईल.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), हिम्मत सिंग, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान आणि रवी बिश्नोई.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर आणि मोहम्मद सिराज.