Retirement : जिथून सुरुवात तिथेच शेवट, दिग्गज खेळाडू या तारखेला होणार निवृत्त, टीमला झटका
Cricket Retirment : अनुभवी खेळाडूने मोठा निर्णय घेतला आहे. हा फलंदाज शेवटचा सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघांची ही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळी फेरीतील शेवटची मालिका आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सामन्यात धमाकेदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेवर एक डाव आणि 242 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी देत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसरा सामना हा 6 ते 10 फेब्रुवारी दरम्यान गॉल येथे होणार आहे. त्याआधी श्रीलंकेच्या अनुभवी खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.
श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज दिमुथ करुणारत्ने याने निवृत्ती जाहीर केली आहे. दिमुथ 100 वा कसोटी सामना खेळून निवृत्त होणार आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा दिमुथच्या कारकीर्दीतील 100 वा सामना असणार आहे. या सामन्यानंतर दिमुथ आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट टीमचा दिमुथला विजयी निरोप देण्याचा प्रयत्न असणार आहे.
शतक ठोकण्याची इच्छा
दिमुथचा अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करण्याचा प्रयत्न असणार आहे. जर मी शतक केलं तर ते माझ्यासाची चांगलं असेल. “फक्त 100 व्या कसोटी सामन्यातच नाही तर प्रत्येक सामन्यात सेंच्युरी करुन संघासाठी योगदान देण्यासाठी मी उत्सूक आहे. मी जर 100 कसोटी सामन्यात शतक केलं तर माझ्यासाठी उपलब्धी असेल”, असं दिमुथने नमूद केलं.
100 कसोटींबाबत काय म्हणाला?
मी माझ्या कारकीर्दीबाबत समाधानी आहे. माझ्यासाठी 100 कसोटी सामने खेळणं ही मोठी अचिव्हमेंट आहे. “कोणत्याही क्रिकेटरचं 100 कसोटी खेळणं आणि 10 हजार धावा करणं हे स्वप्न असतं. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही त्याबाबत विचार करत नाही, मात्र जेव्हा तुम्ही सातत्याने खेळता तेव्हा तुमच्यासमोर वेगवेगळी लक्ष्य असतात”, असं दिमुथने म्हटलं.
दिमुथ करुणारत्नेकडून निवृत्तीची घोषणा
🚨 DIMUTH KARUNARATNE RETIRING FROM CRICKET 🚨
– Karunaratne will be playing his 100th Test against Australia during the 2nd Test and he will be retiring from International cricket after the match. [Sportspavilion] pic.twitter.com/n3gt91FLx6
— Johns. (@CricCrazyJohns) February 4, 2025
जिथून सुरुवात तिथेच शेवट
दरम्यान दिमुथने जिथून कसोटी कारकीर्दीची सुरुवात केली तिथेच तो शेवट करणार आहे. दिमुथने 17 नोव्हेंबर 2012 साली न्यूझीलंडविरुद्ध गॉलमध्ये कसोटी पदार्पण केलं होतं.दिमुथने तेव्हापासून ते आतापर्यंत 99 कसोटी सान्यांमधील 189 डावांमध्ये 1 द्विशतक, 16 शतकं आणि 39 अर्धशतकांसह 7 हजार 172 धावा केल्या आहेत. तर आता दिमुथ 100 व्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात गॉलमध्ये कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.