
मोहम्मद सिराजने 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून केली. आतापर्यंत मोहम्मद सिराज 102 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. पण संघात सहभागी होताच त्याला माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडून कानमंत्र मिळाला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण केलं नसलं तरी एक वरिष्ठ खेळाडू म्हणून त्याने खूप काही शिकवल्याचं मोहम्मद सिराज म्हणाला. द इंडियन एक्सप्रेसच्या द आयडिया एक्सचेंजमध्ये त्याने याबाबतचा खुलासा केला. या कार्यक्रमात त्याला आयपीएल दरम्यान झालेल्या ट्रोलिंगबाबत विचारण्यात आले. तसेच ट्रोलर्स हातळण्याचे कौशल्य कसे मिळवले याबाबत विचारलं. तेव्हा त्याने महेंद्रसिंह धोनीचं नाव घेतलं. तसेच माही भाईकडून बरंच काही शिकायला मिळाल्याचं सांगितलं. धोनीने सर्वात पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे कोणाच्याही बोलण्यात गुंतू नको.
मोहम्मद सिराज धोनीबाबत म्हणाला की, ‘मला आठवतंय की महेंद्रसिंह धोनीने मला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही चांगला काम करता तेव्हा तुमच्यासोबत जग असतं. पण जेव्हा तुमच्याकडून चुका होतात तेव्हा जग तुम्हाला शिवीगाळ करतं.’ यावेळी सिराज भूतकाळ आठवत म्हणाला की, आयपीएल दरम्यान होणारे ट्रोलिंग खूपच वाईट होतं. जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता तेव्हा लोकं तुमची स्तुती करतात. तुमचा खूप आदर करतात. सिराजसारखं कोणीच नाही म्हणून डोक्यावर घेतात. पण पुढच्या सामन्यात तुमच्याकडून वाईट कामगिरी झाली तर तेच लोक तुमची निंदा करतात. कोणत्या प्रकारचा गोलंदाज आहे म्हणून हिणवतात.
मोहम्मद सिराज म्हणाला की, एक सामना तुम्हाला हिरो बनवतो आणि दुसरा सामना शून्य.. लोकांच्या प्रतिक्रिया झपट्यान बदलतात. जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी बाहेर लोकं काय बोलतात याचा विचार करत नाही. त्याने मला काही फरक पडत नाही. मी फक्त त्यांच्यापासून दूर राहण्याचा विचार करतो. आता माझ्यासाठी महत्त्वाचे म्हणजे माझा संघ आणि कुंटुंब काय विचार करते. सिराजने इंग्लंड दौऱ्यात जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने पाच कसोटी सामन्यात 23 गडी बाद केले होते. तर अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 7 विकेट घेतल्या.