Karun Nair : इंग्लंड दौऱ्यावरुन येताच करुण नायरचा पत्ता कट, निवड समितीचा मोठा निर्णय
Karun Nair Excluded: करुण नायर याला देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर बीसीसीआय निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी संधी दिली होती. मात्र आता करुण नायर याला इंग्लंड दौऱ्यानंतर मोठा झटका लागला आहे. जाणून घ्या.

टीम इंडियाने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडचा अवघ्या 6 धावांनी धुव्वा उडवला. भारताने यासह 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली आणि यजमान इंग्लंडला सीरिज जिंकण्यापासून रोखलं. त्यानंतर आता टीम इंडियाचे अनेक खेळाडू देशांतर्गत स्पर्धेत आपली कमाल दाखवणार आहेत. भारतीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज आहेत. इंग्लंड वरुन येताच भारताचा युवा विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेल याला मोठी जबाबदारी मिळाली आहे.
ध्रुव जुरेल याला दुलीप ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेसाठी सेंट्रल झोन संघाचं कर्णधार करण्यात आलं आहे. ध्रुव 15 सदस्यीय संघाचं नेतृत्व करणार आहे. या संघात आयपीएलच्या 18 व्या मोसमातील विजेता कर्णधार रजत पाटीदार आणि कुलदीप यादव या दोघांचा समावेश आहे. मात्र रजतला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. रजत त्या टेस्टमध्ये पास झाला तरच त्याला या स्पर्धेत खेळता येणार आहे. तसेच सेंट्रल झोन टीममध्ये युवा खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.
ध्रुव जुरेलला त्याने आतापर्यंत कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीच्या आधारावर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ध्रुव गेल्या हंगामात रणजी ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. इंडिया ए टीमच्या इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव आणि नेतृत्वगुण या जोरावर ध्रुवची सेंट्रल झोनच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
करुण नायरचा पत्ता कट
निवड समितीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या करुण नायर याला मोठा झटका लागला आहे. करुण नायर याला दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी सेंट्रल झोन संघात स्थान देण्यात आलेलं नाही. करुणने विदर्भासाठी गेल्या हंगामात रणजी ट्रॉफी स्पर्धेत एकूण 863 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतरही करुण नायर याचा विचार करण्यात आला नाही.
निवड समितीने सेंट्रल झोनच्या 15 सदस्यीय संघात फलंदाज, गोलंदाज आणि ऑलराउंडरचं योग्य संतुलन साधलं आहे. आर्यन जुयाल, दानिश मालेवार आणि संचित देसाई या त्रिकुटावर फलंदाजीची मदार असणार आहे. तर दीपक चाहर आणि खलील अहमद या दोघांवर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी आहे.
दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी सेंट्रल झोन टीम : ध्रुव जुरेल (कर्णधार आणि विकेटकीपर), रजत पाटीदार (फिटनेसवर अवलंबून), आर्यन जुयाल, दानिश मालेवार, संचित देसाई, कुलदीप यादव, आदित्य ठाकरे, दीपक चाहर, सरांश जैन, आयुष पांडे, शुभम शर्मा, यश राठोड, हर्ष दुबे, मानव सुथार आणि खलील अहमद.
राखीव खेळाडू : कौशिक, यश ठाकुर, युवराज चौधरी, महिपाल लोमरोर, कुलदीप सेन आणि उपेंद्र यादव.
