ENG vs IND : पहिला सामना पावसाचाच, इंग्लंड-इंडिया सामना रद्द, चाहत्यांची निराशा

England vs India 1st T20I Match Result : टीम इंडियाने 3 फलंदाजांनी केलेल्या फायर खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर 190 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा याने सर्वाधिक धावा केल्या. मात्र पावसामुळे इंग्लंडला बॅटिंगची संधीच मिळाली नाही. पावसामुळे सामना रद्द करावा लागला.

ENG vs IND : पहिला सामना पावसाचाच, इंग्लंड-इंडिया सामना रद्द, चाहत्यांची निराशा
England vs India 1st T20i Rain
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 02, 2026 | 1:41 AM

क्रिकेट चाहत्यांना ज्याची भीती होती अखेर तेच झालं आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला टी 20i सामना हा अखेर पावसामुळे नाईलाजाने रद्द करण्यात आला आहे. उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे चेस्टर ली स्ट्रीटमधील रिव्हरसाईड ग्राउंड स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र पहिला डाव आटोपल्यानंतर जोरदार पाऊस आला. काही मिनिटं पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र पाऊस थांबायचा नावच घेत नव्हता. पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच होती. त्यामुळे नाईलाजाने उभयसंघातील सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा करावी लागली. बीसीसीआयने उभयसंघातील पहिला सामना रद्द करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली. टीम इंडियाचा या मैदानातील सामना पावसामुळे रद्द होण्याची ही तिसरी वेळ ठरली.

सामन्यात काय झालं?

टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध टॉस जिंकला. कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. भारताने इंग्लंड दौऱ्यातील टी 20i मालिकेत जबरदस्त सुरुवात केली. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 189 धावा केल्या. टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे या तिघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही धावा जोडल्या. त्यामुळे भारताला 189 धावांपर्यंत पोहचता आलं.

संजू सॅमसन आणि इशान किशन या दोघांनी निराशा केली. संजूने 1 धाव केली. तर इशानला भोपळाही फोडता आला नाही. हर्षित राणाही झिरोवर आऊट झाला. अक्षर पटेल चोरटी धाव घेताना रनआऊट झाला. उपकर्णधार तिलक वर्मा याने 13 रन्स केल्या. मात्र अभिषेक, श्रेयस आणि शिवम या त्रिकुाटाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या गाठता आली. भारतासाठी श्रेयसने 47 बॉलमध्ये 68 रन्स केल्या. अभिषेकने 24 चेंडूत 59 धावा केल्या. शिवमने 21 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. इंग्लंडसाठी साकीब महमूद याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.

चाहत्यांना टीम इंडियाच्या बॅटिंगनंतर बॉलिंगची प्रतिक्षा होती. मात्र पावसाचा वेग आणखी वाढला. पाऊस थांबेल किंवा जोर कमी होईल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र तसं काही झालं नाही. त्यामुळे अखेर काही मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर सामना रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. आता उभयसंघातील दुसरा सामना हा 4 जुलैला होणार आहे.

Follow Us