
इंग्लंड क्रिकेट टीमने बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात टीम इंडिया विरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. इंग्लंडने लीड्समध्ये पहिल्या सामन्यातील पाचव्या आणि अंतिम दिवशी भारतावर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने हे आव्हान 82 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 373 धावा केल्या. इंग्लंडने यासह 1-0 अशी आघाडी घेतली. बेन डकेट हा इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. डकेटने शतकी खेळी केली. तर इतर फलंदाजांनी चांगली साथ देत इंग्लंडच्या विजयात योगदान दिलं.
इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 21 धावा केल्या. त्यानंतर बेन डकेट आणि झॅक क्रॉली या जोडीने पाचव्या दिवशी अप्रतिम सुरुवात केली आणि इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. डकेट आणि क्रॉली जोडीने टीम इंडियाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. या दोघांनी 188 धावांची सलामी भागीदारी केली आणि टीम इंडियाला बॅकफुटवर फेकलं. इंग्लंडने झॅक क्रॉलीच्या रुपात पहिली विकेट गमावली. क्रॉलीने 65 रन्स केल्या.
त्यानंतर ओली पोप स्वस्तात आऊट झाला. पोपने 8 रन्स केल्या. शार्दूल ठाकुर याने बेन डकेट आणि हॅरी ब्रूक या दोघांना सलग 2 चेंडूवर बाद केलं. डकेटने सर्वाधिक 149 धावा केल्या. तर हॅरी ब्रूक पहिल्याच बॉलवर आऊट झाला. शार्दुलने घेतलेल्या सलग 2 विकेट्समुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा वाढल्या. मात्र इंग्लंडच्या इतर फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली.
टीम इंडियाची पराभवाने सुरुवात
England win the opening Test by 5 wickets in Headingley#TeamIndia will aim to bounce back in the 2nd Test
Scorecard ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#ENGvIND pic.twitter.com/9YcrXACbHn
— BCCI (@BCCI) June 24, 2025
बेन स्टोक्स याने 33 धावा जोडल्या आणि आऊट झाला. त्यानंतर जो रुट आणि जेमी स्मिथ या दोघांनी इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवलं. रुटने नाबाद 53 धावा केल्या. तर स्मिथने नॉट आऊट 44 रन्स केल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी निराशा केली. शार्दुलने 2 विकेट्स घेत विजयाची संधी निर्माण केली. मात्र इतरांना काही खास करता आलं नाही. शार्दुल व्यतिरिक्त प्रसिध कृष्णा याने दोघांना बाद केलं. तर रवींद्र जडेजाने 1 विकेट मिळवली.
टीम इंडियाने पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत या तिघांनी शतक केलं. मात्र इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 500 धावाही करता आल्या नाहीत. भारताचा पहिला 471 धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने प्रत्युत्तरात 465 रन्स केल्या. त्यामुळे भारताला नाममात्र 6 धावांची आघाडी मिळाली.
भारताकडून त्यानंतर केएल राहुल याने शतक केलं. तर ऋषभने पुन्हा शतक केलं. ऋषभने यासह एकाच सामन्यात दुसरं शतक केलं. टीम इंडियाने यासह एकाच सामन्यात 5 शतकं पूर्ण केली. मात्र दुसऱ्या डावातही टीम इंडियाच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये 364 रन्सवर ऑलआऊट झाली. त्यामुळे इंग्लंडला 371 रन्सचं टार्गेट मिळालं. इंग्लंडने हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत यशस्वीरित्या विजयी सुरुवात केली.