ENG vs IND : यशस्वी जैस्वालची इंग्लंड विरुद्ध वनडे स्टाईल फिफ्टी, गावसकरांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
Yashasvi Jaiswal Fifty : भारताने इंग्लंड विरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यातील पहिल्या सत्रात 2 विकेट्स गमावून 98 रन्स केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने यात सर्वाधिक नाबाद 62 धावांचं योगदान दिलं आहे.

टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने इंग्लंड दौऱ्यात धावा करण्याचा धडाका कायम ठेवला आहे. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात येत आहे. यशस्वीने सामन्यातील पहिल्या डावात खणखणीत अर्धशतक ठोकलं आहे. यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील हे 11 वं तर इंग्लंड विरुद्धचं चौथं अर्धशतक ठरलं आहे. यशस्वी या अर्धशतकासह दिग्गज माजी कर्णधार सुनील गावसकर यांचा रेकॉर्डच्या आणखी जवळ पोहचला आहे.
इंग्लंडकडून जोश टंग हा भारताच्या डावातील 22 वी ओव्हर टाकायला आला. करुण नायर याने पहिल्या बॉलवर एक धाव घेत यशस्वीला स्ट्राईक दिली. यशस्वीने टंगच्या ओव्हरमधील दुसरा बॉल डॉट केला. त्यानंतर यशस्वीने सलग 2 चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. यशस्वीने यासह 59 चेंडूत 89.83 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावलं. यशस्वीने या अर्धशतकी खेळीत 10 चौकार लगावले.
दुसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी
भारताने केएल राहुल याच्या रुपात 15 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर यशस्वी आणि करुण नायर या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. मात्र करुण लंचब्रेकला काही मिनिटांचा खेळ बाकी असतानाच आऊट झाला. करुणने 50 बॉलमध्ये 5 फोरसह मदतीने 31 रन्स केल्या. करुण आऊट झाल्यानंतर फक्त 9 चेंडूंचा खेळ झाला. त्यानंतर लंचब्रेक झाला.
कर्णधार शुबमन गिल 1 धावेवर नाबाद परतला. तर यशस्वी 69 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 62 धावांवर नाबाद आहे. त्यामुळे आता यशस्वीला भारताकडून सुनील गावसकर यांचा कसोटीत वेगवान 2 हजार धावांचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी आणखी 35 धावांची गरज आहे.
यशस्वीचं अर्धशतक
Yashasvi Jaiswal continues his fine form with the bat 👌👌
The #TeamIndia opener reaches his 11th Test FIFTY with a stylish four 🙌
Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND | @ybj_19 pic.twitter.com/QKLUDnUA4w
— BCCI (@BCCI) July 2, 2025
गावसकरांना पछाडण्याची संधी
सुनील गावसकर यांनी 23 कसोटी सामन्यांमध्ये 2 हजार धावांचा टप्पा गाठला होता. तर यशस्वीने आतापर्यंत 21 सामन्यांमधील 39 डावांमध्ये 54.58 च्या सरासरीने 1 हजार 965 धावा (लंचपर्यंत) केल्या आहेत. त्यामुळे यशस्वी या सामन्यातही शतक करुन गावसकरांचा रेकॉर्ड ब्रेक करणार का? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
यशस्वीचं पहिल्या सामन्यात शतक
दरम्यान यशस्वीने लीड्समध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात खणखणीत शतक ठोकलं होतं. यशस्वीने त्या सामन्यात 101 धावा केल्या होत्या. तर दुसर्या डावात यशस्वीने 4 धावा जोडल्या होत्या.
