
टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडने जोरदार कमबॅक केलं आहे. भारताने झटपट 5 झटके देत इंग्लंडला बॅकफुटवर फेकलं होतं. मात्र हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ या जोडीने नाबाद दीडशतकी भागीदारी करत इंग्लंडला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं आहे. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 587 धावा केल्या. मात्र आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या दोघांनी धारदार बॉलिंगच्या जोरावर इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे भारतीय संघाकडे इंग्लंडला फॉलोऑन देण्याची संधी होती. मात्र जेमी स्मिथ याने खेळच बदलला. जेमीने टेस्टमध्ये टी 20i स्टाईल शतक ठोकलं. जेमीने प्रसिध कृष्णा याच्या एका ओव्हरमध्ये 23 धावा केल्या.
इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 77 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. त्यानंतर मोहम्मद सिराज याने तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या ओव्हरमधील सलग 2 चेंडूंमध्ये जो रुट आणि बेन स्टोक्स यांना आऊट केलं. त्यामुळे इंग्लंडची स्थिती 5 आऊट 84 अशी झाली. त्यानंतर हॅरी ब्रूक याची साथ देण्यासाठी जेमी स्मिथ मैदानात आला.
जेमी आणि हॅरी या जोडीने कोणत्याही दबावात न खेळता भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. जेमीनने प्रसिध कृष्णाच्या बॉलिंगवर जोरदार फटकेबाजी केली. प्रसिधने लंचपर्यंत 8 ओव्हरमध्ये 61 धावा लुटवल्या. त्यानंतर जेमीने वॉशिंग्टन सुंदर याच्या फिरकी गोलंदाजीवर मोठे फटके मारले. जेमी स्मिथने अशाप्रकारे फक्त 80 चेंडूत 126. 25 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं. जेमीने या शतकी खेळीत 14 चौकार आणि 3 षटकार ठोकले. जेमीच्या कसोटी कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं. तसेच जेमीने या शतकासह हॅरी ब्रूकच्या विक्रमाची बरोबरी केली. जेमी इंग्लंडसाठी वेगवान शतक करणारा संयुक्तरित्या तिसरा फलंदाज ठरला.
इंग्लंडने लंच ब्रेकपर्यंत 47 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 249 धावा केल्या. जेमी स्मिथ 102 तर हॅरी ब्रूक 91 धावांवर नाबाद आहे. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नॉट आऊट 165 रन्सची पार्टनरशीप केली आहे. त्यामुळे लंचनंतर भारतीय गोलंदाजांसमोर या जोडीला रोखण्याचं आव्हान असणार आहे.