
भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंड विरुद्ध लीड्समध्ये पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने टीम इंडियावर 5 विकेट्सने मात करत विजयी सुरुवात केली. आता उभयसंघातील दुसरा सामना हा 2 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडचा हा सामना जिंकून मालिकेतील आघाडी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियासमोर कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. हा सामना बर्मिंगहॅममध्ये आयोजित करण्यात आला आहे. बर्मिंगहॅममध्ये भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्यामुळे हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन शुबमन गिल या जोडीवर दुहेरी दबाव असणार आहे. मात्र टीम इंडियाच्या एका खेळाडूची या मैदानात जबरदस्त आकडेवारी आहे.
टीम इंडियाच्या युवा खेळाडूने बर्मिंगहॅममध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. या फलंदाजाने बर्मिंगहॅममध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. या खेळाडूची बर्मिंगहॅममधील कामगिरी कर्णधार शुबमन गिल याच्यासाठी काही प्रमाणात दिलासादायक बाब आहे. तो कोण आहे? जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बर्मिंगहॅममधील एजबेस्टन क्रिकेट ग्राउंडमध्ये दुसऱ्याचा सामन्याचा थरार रंगणार आहे. ऋषभ पंत याने या मैदानात चमकदार खेळी केली आहे. पंतने या मैदानात 2022 साली इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळला होता. पंतने तेव्हा पाचव्या स्थानी बॅटिंग केली होती. पंतने एजबेस्टन क्रिकेट ग्राउंडमध्ये 111 बॉलमध्ये 146 धावांची खेळी कली होती. ऋषभने दुसऱ्या डावातही चाबूक बॅटिंग केली होती. पंतने दुसऱ्या डावात 86 चेंडूत 57 धावा केल्या होत्या. पंत दुसर्या कसोटीत याच अंदाजात खेळला तर टीम इंडिया सहज मोठी धावसंख्या करु शकतो. तसेच पंतला सूर गवसला तर इंग्लंडच्या गोलंदाजांना धुलाई होण्यापासून कुणीही बचावू शकणार नाही. त्यामुळे पंतची या मैदानातील भूमिका निर्णायक ठरु शकते.
ऋषभ पंत याने इंग्लंड विरुद्ध आतापर्यंत चाबूक कामगिरी केली आहे. पंतने इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 4 कसोटी शतकं झळकावली आहेत. पंतने त्यापैकी 2 शतंक ही लीड्समध्ये पहिल्या कसोटीत केली आहेत. पंतने पहिल्या डावात 134 धावा केल्या. तर दुसर्या डावात 118 धावा केल्या. पंत विदेशात दोन्ही डावात शतक करणारा पहिला विकेटकीपर बॅट्समन ठरला. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला लीड्समध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे टीम इंडियाला मालिकेत बरोबरी करायची असेल तर पंतला बॅटिंगसह स्टंपमागूनही आणखी चांगली कामगिरी करावी लागेल.