Rishabh Pant : ऋषभ पंतचा मोठा कारनामा, लॉर्ड्समध्ये रेकॉर्डब्रेक खेळी, धोनीला पछाडलं
England vs India 3rd Test : टीम इंडियाचा विकेटकीपर आणि उपकर्णधार ऋषभ पंत याने लॉर्ड्समध्ये अविस्मरणीय अशी कामगिरी केली आहे. पंतने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

टीम इंडियाचा उपकर्णधार आणि विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसर्या दिवशी मोठा कारनामा केला आहे. ऋषभ पंतला दुखापत झाल्याने त्याच्या जागी ध्रुव जुरेल याने विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळली. मात्र भारताने पहिल्या डावात 3 विकेट्स गमावल्यानंतर ऋषभ पंत दुखापतीला बाजूला करत मैदानात आला. पंतने यादरम्यान केएल राहुलची चांगली साथ दिली. पंत आणि केएल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी तिसऱ्या दिवशी शतकी भागीदारी केली. पंतने या भागीदारी दरम्यान टीम इंडियाची माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंह धोनी याचा रेकॉर्ड ब्रेक केला.
महेंद्रसिंह धोनी याला पछाडलं
धोनीने 2014 साली इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत 349 धावा केल्या होत्या. पंतने धोनीच्या या 349 धावांचा विक्रम या तिसऱ्या सामन्यात मोडीत काढला आहे. तसेच पंतची सेना देशात (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) 350 पेश्रा अधिक धावा करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. पंतने याआधी 2018 साली ऑस्ट्रेलियामध्ये 350 धावा केल्या होत्या.
पंतची पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यातील कामगिरी
तसेच पंतने यंदाच्या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात शतक ठोकलं होतं. केएलने पहिल्या डावात 134 तर दुसऱ्या डावात 118 धावा केल्या. तर पंतने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात 25 तर दुसर्या डावात 65 धावांचं योगदान दिलं. पंतने या खेळीसह टीम इंडियाच्या विजयात निर्णायक योगदान दिलं. तर आता पंतने तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात धोनीला मागे टाकलं आहे. पंतने याआधी 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध एकाच मालिकेत 349 धावा केल्या होत्या.
आणि पंत रन आऊट
दरम्यान पंतने तिसऱ्या दिवशी लंचआधीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये निराशा केली. पंत 66 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर केएल राहुल याला स्ट्राईक देण्यासाठी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पंत या प्रयत्नात स्वत:च्याच कॉलवर रन आऊट झाला. पंत आऊट झाल्याने टीम इंडियाने चौथी विकेट गमावली. पंत आणि केएल या जोडीने चौथ्या विकेटसाठी 141 धावांची भागीदारी केली. पंतने 112 बॉलमध्ये 8 फोर आणि 2 सिक्ससह 74 रन्स केल्या.
