ENG vs IND : लॉर्ड्स टेस्टसाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा, 5 जणांना डच्चू, या खेळाडूंच कमबॅक

England vs India 3rd Test Playing 11 : टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तर तिसऱ्या सामन्याचा थरार 10 जुलैपासून ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर रंगणार आहे.

ENG vs IND : लॉर्ड्स टेस्टसाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा, 5 जणांना डच्चू, या खेळाडूंच कमबॅक
England vs India Test Series 2025
Image Credit source: Bcci
| Updated on: Jul 09, 2025 | 5:32 PM

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहेत. दोन्ही संघांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपल्या पहिल्या मालिकेतील पहिला विजय मिळवला आहे. आता उभयसंघातील तिसरा कसोटी सामना हा 10 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. सामन्याचं आयोजन हे क्रिकेटची पंढरी म्हटलं जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे करण्यात आलं आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

जोफ्रा आर्चरचं कमबॅक

इंग्लंडने दुसर्‍या कसोटीतील पराभवानंतर तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये फक्त 1 बदल केला आहे. जोश टंग याच्या जागी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचं कमबॅक झालं आहे. जोफ्रा 4 वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. जोफ्राने 2021 साली अखेरचा कसोटी सामना टीम इंडिया विरुद्धच खेळला होता. त्यानंतर अखेर 4 वर्षांनी स्थान मिळवण्यात जोफ्रा यशस्वी ठरला आहे.

इंग्लंडने तिसऱ्या सामन्यासाठी एकूण 16 सदस्यीय संघ जाहीर केला होता. इंग्लंडने 16 वा खेळाडू म्हणून गस एटकीन्सन याचा समावेश केला होता. त्यामुळे प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणत्याही 5 खेळाडूंची निवड होणार नाही, हे निश्चित होतं. आता प्लेइंग ईलेव्हन जाहीर झाल्यानंतर ते 5 खेळाडू कोण आहेत? हे स्पष्ट झालं आहे.

या 5 खेळाडूंना संधी नाही

जेकब बेथेल, गस ॲटकिन्सन, जॉश टंग, जेमी ओवरटन आणि सॅम कुक.

टीम इंडियाकडून पराभवाची परतफेड

दरम्यान भारतीय संघाने दुसर्‍या सामन्यात इंग्लंडवर मात करत मालिकेत बरोबरी साधली. भारताने इंग्लंडवर तब्बल 336 धावांच्या ऐतिहासिक फरकाने विजय मिळवला. भारताचा हा विदेशातील धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. मात्र विजयानंतरही प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे कॅप्टन शुबमन गिल या सामन्यासाठी किती बदल करतो? याकडे इंग्लंड टीम मॅनेजमेंटसह भारतीय क्रिकेट चाहत्यांचंही लक्ष असणार आहे.

इंग्लंड तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ, क्रिस वोक्स, ब्रायडन कार्से, जोफ्रा आर्चर आणि शोए​ब बशीर.