ENG vs IND : जो रुट याची शतकी हॅटट्रिक, ओव्हलमध्ये रेकॉर्ड्सची रांग, काय काय केलं?

Joe Root Century : इंग्लंडचा मिडल ऑर्डरमधील अनुभवी फलंदाज जो रुट याने टीम इंडिया विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात शतक ठोकलं. रुटने यासह इंग्लंडला अडचणीतून बाहेर काढलं. जो रुटचं हे टीम इंडिया विरुद्धचं 13 वं शतक ठरलं.

ENG vs IND : जो रुट याची शतकी हॅटट्रिक, ओव्हलमध्ये रेकॉर्ड्सची रांग, काय काय केलं?
Joe Root Hundred ENG vs IND 5th Test
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 03, 2025 | 10:36 PM

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने पुन्हा एकदा शतक ठोकलंय. जो रुटने लॉर्ड्स आणि मँचेस्टरनंतर आता लंडन येथील केनिंग्टन ओव्हलमधील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी दुसर्‍या डावात शतक ठोकलं आहे. रुटने 137 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. रुटने यासह अनेक विक्रमांना गवसणी घातलीय. इंग्लंड या सामन्यात बॅकफुटवर होती. मात्र हॅरी ब्रूक आणि जो रुट या जोडीने शतकी खेळी करुन इंग्लंडला सावरलं आणि भारताला मागे टाकलं. रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 39 वं शतक ठरलं. रुटने यासह अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेत शतकांची हॅटट्रिक पूर्ण केली.

रुटचा टीम इंडिया विरुद्ध झंझावात

जो रुट याचं टीम इंडिया विरुद्धचं 13 वं कसोटी शतक ठरलं. रुटने यासह टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम आणखी भक्कम केला आहे. रुटनंतर टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक कसोटी शतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलिया अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ दुसर्‍या स्थानी आहे. स्मिथ 11 शतकांसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.

जो रुटची शतकी हॅटट्रिक

रुटने लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 104 धावा केल्या होत्या. रुटने त्यानंतर मँचेस्टरमध्ये झालेल्या चौथ्या सामन्यातही शतक झळकावलं होतं. रुट या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर पहिल्या स्थानी भारतीय कर्णधार शुबमन गिल आहे. शुबमनच्या नावावर 754 धावा आहेत.

6 हजारी रुट

रुटने दुसर्‍या डावातील या शतकासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत इतिहासात घडवला. रुटने या स्पर्धेत 6 हजार धावा पूर्ण केल्या. रुटने 69 व्या डावात ही कामगिरी केली. रुटने 53.27 च्या सरासरीने या धावा केल्या. तसेच रुटने या दरम्यान 21 शतकं आणि 22 अर्धशतकं झळकावली.

जो रुटचं ऐतिहासिक शतक

सर्वाधिक कसोटी शतकं करणारा चौथा फलंदाज

जो रुट याने 39 व्या शतकासह आणखी एक कारनामा केला आहे. रुट श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा याला मागे टाकत कसोटीत सर्वाधिक शतकं करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. रुटने संगकारा याचा 38 शतकांचा विक्रम मोडीत काढला.